मुंबईकरांनो, घरांमध्ये बसवा ‘मेन स्विच’सह एम.सी.बी.,एल.सी.बी.

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मागील काही दिवसांमध्ये लागलेल्या आगीच्या दुघर्टना या शॉर्ट सर्किटमुळेच लागल्याचं समोर आल्याने मुंबई महापालिकेने घरातील इलेक्ट्रीक वायरींग आणि फिटींगबाबत सतर्क केलं आहे. खासकरून ज्या वीज मीटरमधून आपल्या घरात वीज येते, त्याठिकाणी इलेक्ट्रीशिअनच्या सल्ल्यानुसार ‘मेन स्विच’सह एम.सी.बी. तथा एल.सी.बी. बसवण्याच्या सूचनाही महापालिका आणि अग्निशमन दलाने केल्या आहेत.

काय फायदा?

‘मेन स्विच’सह एम.सी.बी. आणि एल.सी.बी. बसवल्यास उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास किंवा कुणाला शॉक् लागल्यास विद्युत प्रवाह आपोआप खंडीत होईल आणि होणारी दुघर्टना टळेल, असं महापालिकेने म्हटलं आहे.

व्यावसायिक वापर

मुंबईत विविध व्यवसायांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने एल.पी.जी. सिलिंडर, पाइप्ड नॅचरल गॅस, विद्युत उपकरणे, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड यासारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. या इंधन प्रकारानुसार संबंधितांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घ्यायच्या काळजीबाबत (Fire Codified Requirements) आणि अनुषंगीक नियम, सूचना आदींबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाने जारी केली आहे. यामध्ये वायरींग आणि फिटींगबाबत नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत.

'ही' दक्षता घ्या

अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे किंवा अयोग्य विद्युत जोडणीमुळे आगी लागत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, वायरिंग याबद्दल अत्यंत सजग असणं अतिशय गरजेचं आहे. सर्व बटन, स्विच, वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे इत्यादी वीज दाब क्षमतेला अनुरुप व आय. एस. आय. प्रमाणित असावेत. त्यांची जोडणी, फिटींग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करवून घ्यावी, अशी सूचना महापालिकेने केली आहे.

ज्या खोलीत अन्न शिजविले जातात, त्या खोलीमध्ये गॅस, लाकूड इत्यादी इंधन प्रकारानुसार तपमान कमी जास्त असू शकतं. हे लक्षात घेऊन त्या खोलीतील वायरिंग, विद्युत खटके, विद्युत उपकरणे इत्यादींची तपासणी संबंधित तंत्रज्ञांकडून स्वतंत्रपणे व नियमित करण्यात यावी.


हेही वाचा-

खैराणी रोड भागात फरसाणच्या दुकानाला आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

लोखंडवाला येेथे इमारतीच्या सहाव्या मजल्याला आग


पुढील बातमी
इतर बातम्या