महापालिकेच्या 'डी' वाॅर्ड कार्यालयात मनसे, शिवसेनेचा राडा

गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यास परवानगी न देणं तसंच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे प्रकार सध्या महापालिकेकडून ग्रँटरोड भागात सुरू आहे. याचा जाब विचारण्यास गेलेल्या मनसे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाला 'डी' विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्तांनी भेट न दिल्याने संतप्त झालेल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांची खुर्ची कार्यालयाखाली आणून तिला हारफुले वाहत प्रतिकात्मक निषेध नोंदवला.

नेमकं काय झालं?

गणेशोत्सव मंडळावर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईचा जाब विचारण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ महापालिकेच्या 'डी' विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांना दुपारी पावणे बाराच्या सुमारास गेलं होतं. मात्र सहायक आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि मोटे यांची बाचाबाची झाली. त्यानंतरही मोटे यांनी भेट न दिल्यामुळे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले.

शिवसेनेचीही साथ

दरम्यान, तिथं शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि त्यांचे २ शिवसैनिक पोहोचले. त्यांनीही मोटे आणि प्रशासनाविरोधात तीव्र राग व्यक्त करत दरवाज्यावर लाथा मारण्यास सुरुवात केली. तेव्हा मनसेचे पदाधिकारीही आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सहायक आयुक्त विश्वास मोटे आणि कार्यकारी अभियंता यांची खुर्ची जिन्यावरून खाली फेकून दिली.

गणेशोत्सव साजरा करू न देणाऱ्या या अधिकाऱ्याचा निषेध म्हणून नंतर याच खुर्चीला हारफुले वाहून खुर्चीची प्रतिकात्मक पूजा करण्यात आली. दरम्यान गावदेवी पोलिसांनी मनसे आणि शिवसेनेच्या १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न

गणेशात्सव मंडळांमध्ये समन्वय राखण्यासाठी २० दिवसांपूर्वी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी या भागातील १२१ मंडळांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सर्व मंडळांनी पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतूककोंडी होईल, अशाप्रकारे मंडप न उभारता किंवा अस्तित्वातील मंडपांचा आकार कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसंच परवानगीशिवाय कोणीही मंडप उभारु नये, अशा सूचना केल्या होत्या. यालाही सर्व मंडळांनी सहमती दर्शवली होती. एवढंच नव्हेतर ऑनलाईन अर्ज भरता यावा याकरता हेल्पडेस्क विभाग कार्यालयात सुरु करण्यात आला आहे, आमची पथकेही मंडळांच्या भेटी घेत आहे. परंतु सर्व सुरळीत सुरु असताना केवळ वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं डी. विभागाचं सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

मग आरक्षणाचा काय उपयोग?- राज ठाकरे

गणेशोत्सवातच खड्डे का बुजवले जातात ? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल


पुढील बातमी
इतर बातम्या