नव्या वादाला बगल, मुख्यमंत्र्याची 'रिव्हर मार्च'ला दांडी!

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • सिविक

दहिसर, पोईसर, ओशिवरा या प्रदूषित नद्यांच्या स्वच्छतेसाठी आणि जनजागृतीसाठी 'रिव्हर मार्च' या संस्थेच्या वतीने रविवारी रिव्हर मार्च या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला मुख्यमंत्राच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रॅलीला दांडी मारली. 'रिव्हर मार्च'च्या व्हिडिओत गाणाऱ्या, नाचणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी सडकून टिका केली होती. या टिकेनंतर स्वत: ला नव्या वादापासून दूर ठेवण्यासाठी या रॅलीला त्यांनी जाणीवपूवर्क बगल दिल्याचं म्हटलं जात आहे.

नद्यांची निगा राखा ...

या रॅलीत शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या रॅलीला मुख्यमंत्राच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप आमदार राम कदम, सामाजिक कार्यकर्ते विक्रम चोगले, अभिनेता सुमित राघवन उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी नद्यांची निगा राखण्याचं आवाहन उपस्थितांना केलं.

काय होतं 'त्या' व्हिडिओत?

नदी संवर्धनाच्या कार्यात जनतेला सहभागी करून घेण्यासाठी नद्यांवर आधारित एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओत अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गाणं गायलं आहे. या गाण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर जनतेला नदी वाचवण्याचं आवाहन करताना दिसत आहेत.

या व्हिडिओत सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने एका खासगी व्हिडिओत मुख्यमंत्र्यांसहित सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग कसा घेतला? यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं.


हेही वाचा-

श्री व सौ फडणवीसांचा व्हिडीओ, काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न

मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ 'रीव्हर मार्च'चा, शासनाचा नाही!


पुढील बातमी
इतर बातम्या