Advertisement

श्री व सौ फडणवीसांचा व्हिडीओ, काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न

'मुंबई रिव्हर अॅन्थम' नावाने टी सीरिज कंपनीतर्फे एका व्यावसायिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून या व्हिडिओत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आलं आहे.

श्री व सौ फडणवीसांचा व्हिडीओ, काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न
SHARES

'मुंबई रिव्हर अॅन्थम' नावाने टी सीरिज कंपनीतर्फे एका व्यावसायिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून हा व्हिडिओ यू ट्युब आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आलं आहे. राज्यापुढं इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना या व्यावसायिक व्हिडिओत सहभागी होण्याची गरज काय? असा प्रश्न विचारत यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी केली.


पहिल्यांदाच मुख्यमंत्री नाचले

या अगोदरही अशा तऱ्हेचे काही व्हिडिओ टी सीरिज कंपनीतर्फे बनवण्यात आले आहेत. परंतु राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादे मुख्यमंत्री नाचले आहेत. या व्हिडिओत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी व पोलीस नाचता गाताना दिसलेले आहेत.

राज्यापुढे प्रश्नांचा खच असताना त्यांचं असं वर्तन अशोभनीय आहे. काँग्रेसने यासंदर्भात काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले असून मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुलाचा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.


काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना विचारलेले १० प्रश्न


  1. टी सीरीज या कंपनीशी शासनाचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कंपनीसोबत कौटुंबिक नाते आहे? यामधील आदान प्रदान काय आहे?
  2. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा सदर कंपनीशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा.
  3. जर शासनाशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली?
  4. मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडिओसाठी मानधन घेतलं आहे का?कलाकारांचं मानधन कोणी दिलं?व या व्हिडीओचा खर्च कोणी केला?
  5. शासकीय अधिकाऱ्यांना या व्हिडिओमध्ये काम करण्याचे आदेश कोणी दिले? सदर काम त्यांच्या कार्यकक्षेत येतं का?
  6. वर्षा हे शासकीय निवासस्थान चित्रीकरणासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली?
  7. हा व्हिडिओ खासगी असेल तर अशा खासगी प्रकल्पात अधिकाऱ्यांनी स्वखुशीने काम केलं की, त्यांना काम करण्याचे आदेश दिले?
  8. स्वतः च्या अतिव्यस्त कार्यक्रमातून व अतिमहत्त्वाच्या जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी या व्हिडिओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला तसेच इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांचे काम बाजूला ठेवून यामध्ये समाविष्ट केलं गेलं याचा अर्थ सदर व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईच्या नदीसारखे जटील प्रश्न सोडवलं जाऊ शकतात अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे का?
  9. असल्यास राज्यात १३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागल्या अशा व बेरोजगारी, कुपोषण, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई, इत्यादी सारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासन असेच व्हिडिओ बनवणार आहे का?
  10. अशा व्हिडिओमध्ये काम करण्याकरीता त्या त्या विषयाशी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांना अभिनयाचे व नृत्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे का?
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा