Advertisement

मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ 'रीव्हर मार्च'चा, शासनाचा नाही!


मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ 'रीव्हर मार्च'चा, शासनाचा नाही!
SHARES

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून उलट सुलट चर्चा सुरू असल्याने अखेर मुख्यमंत्री कार्यालयावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.


शासनाचं स्पष्टीकरण

मुंबईतील नद्या स्वच्छ करण्यासाठी ईशा फाऊंडेशन, रिव्हर मार्च अशा अनेक संघटनांनी गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू केलं आहे. अशा अनेक संघटनांनी आपल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे मांडल्या होत्या. या सर्व संघटनांची एक बैठकसुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि त्यात नदी शुद्धीकरणासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

या अभियानाला आणखी गती देण्यासाठी आणि त्यादृष्टीने जनजागरण व्हावं, यासाठी एक ध्वनीचित्रफीत तयार करण्याचं 'रीव्हर मार्च' या संस्थेनं निश्चित केलं. हे आवाहन मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने संयुक्तपणे केल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल, अशी विनंती रिव्हर मार्चतर्फे विक्रम चौगले यांनी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शवली.

या चित्रफितीत राजकीय नेतृत्त्वासोबतच मुंबईसाठी काम करणारे मुंबईचे महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त इत्यादी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनीच विनंती केली आणि या निसर्ग संवर्धनाच्या, समाजोपयोगी कामासाठी त्यांनी सहर्ष होकार दिल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.


हा निर्णय 'रीव्हर मार्च'चा

ही चित्रफीत कोणत्या संस्थेमार्फत करायची? याचा निर्णय 'रीव्हर मार्च'नेच घेतला होता. कारण, त्याचा खर्च त्यांनीच केलेला होता. या चित्रफितीचा कुठलाही व्यावसायिक वापर होणार नाही, असं त्यांनी प्रारंभीच स्पष्ट केलं होतं. तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी इतरही काही संस्थांची मदत घेतली. टी-सीरिजचे यूट्यूब फॉलोअर्स अधिक असल्याने हा व्हिडिओ केवळ यूट्यूबवर अपलोड करण्यासाठी त्यांना दिला. तो टी-सीरीजने तयार केलेला नाही.


'शासनातर्फे निधी खर्च झालेला नाही'

शासनातर्फे या व्हिडिओवर कोणताही निधी खर्च झालेला नाही आणि त्याचा कुठल्याही विभागाशी संबंध नाही. कुठल्याही सामाजिक उपक्रमात नागरिकांना आवाहन करण्याची विनंती संबंधित संस्थेने केली, तर मुख्यमंत्री त्याला होकार देतात. अनेक माध्यमांच्या वतीने सुद्धा विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात आणि अशा प्रत्येक वेळी मुख्यमंत्री त्यात सहभागी होतात, असंही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा