CNG आणि PNG च्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महानगर गॅस लिमिटेडनं पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रतिएकक आणि प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारनं ६२ टक्के वाढ केल्याचा हा परिणाम आहे.

याच पार्श्वभूमीवर ही दरवाढ ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीनं स्पष्ट केलं आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो ५१.९८ रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर ४९.४० रुपये इतका आहे.

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता १ ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले. पूर्वीचा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या १.७९ डॉलर्स इतका होता.

१ ऑक्टोबरपासून हे दर वाढवण्यात आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती १० ते ११ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात मुंबईत महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात किलोमागे २.५८ रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत ५५ पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.


हेही वाचा

काळबादेवी इमारत दुर्घटनेत ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दोन्ही डोस घेतलेल्यांना ऑनलाईनही मिळतोय युनिव्हर्सल पास, ‘ही’ आहे प्रक्रिया

पुढील बातमी
इतर बातम्या