मुंबईतील दुकानं, हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवण्याची काँग्रेसची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत काही औषधांची दुकानं वगळता सर्वच दुकानं रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास बंद होतात. त्यामुळं अनेकदा मुंबईकरांची गैरसोय होते. मात्र, आता मुंबईतील जीवनावश्यक दुकाने, हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसनं मागणी केली आहे.

महापालिका आयुक्तांची भेट

न्यूयॉर्कप्रमाणं मुंबईतील हॉटेल्स, औषधांची दुकाने, अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन मंगळवारी केली. या मागणीबाबत पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

या विषयांवर चर्चा

मुंबईतील विकास कामं आणि नागरिकांचे प्रश्न याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या २९ नगरसेवकांनी मंगळवारी प्रवीण परदेसी यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालये, खड्डेमय रस्ते, घरगल्ल्यांची स्वच्छता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांकडं पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याबद्दल नगरसेवकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

जीवनावश्यक वस्तू

मुंबईमध्ये हॉटेल्स, जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं, औषधाची दुकानं आदी २४ तास खुली ठेवण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेस नगरसेवकांनी या बैठकीत केली. मात्र तसे करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचाही विचार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश देण्यात येतील. तसंच १ महिन्यानंतर नगरसेवकांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन परदेशी यांनी दिल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.


हेही वाचा -

अखेर कांदा १५० रुपये प्रति किलो

शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी २०० रुपये


पुढील बातमी
इतर बातम्या