बेहरामपाड्यातून तब्बल ३७ हजार स्थलांतरितांचे अर्ज

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या कर्मचारी वर्गाला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आहे. कोरोनाची भीती आणि लॉकडाऊनमुळं आलेल्या बेरोजगारीमुळं मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आपापल्या गावाकडं जात आहे. त्यामुळं येत्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात श्रमिकांचा तुटवडा निर्माण होणार आहे. दरम्यान, आपल्या गावी जाण्यासाठी अर्ज दाखल करावे लागत असून, काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील मजुरांच्या निदर्शनांमुळं चर्चेत आलेल्या बेहरामपाडा या परिसरातूनच तब्बल ३७ हजार स्थलांतरितांचे आपापल्या प्रांतात जाण्यासाठी अर्ज आले आहेत.

मुंबईतील बांधकाम उद्योगांपासून विविध प्रकल्पांच्या उभारणीतील महत्त्वाचा घटक असलेला मजूर वर्ग कमी होऊ लागल्यानं चिंता व्यक्त होत आहे. विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात येत आहे. त्यासाठी मजुरांची नोंद त्यांनी केलेल्या अर्जाद्वारे मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये केली जात आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९६ मध्ये असलेल्या बेहरामपाड्यातून निर्मलनगर पोलीस ठाण्यात ३७ हजार अर्ज जमा झाले आहेत. एप्रिल महिन्यात वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीय कामगारांनी आपापल्या राज्यात परत जाण्यासाठी धरणे धरले होते. वांद्रे न्यायालय ते वांद्रे स्टेशन असा पसरलेला प्रभाग क्रमांक ९६ मध्ये अंदाजे ७० हजार लोकसंख्या आहे. त्यापैकी निम्मी लोकसंख्या ही परप्रांतीय मजुरांची आहे.


हेही वाचा -

पावसाळ्यात लोकलचं वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी विविध कामांना गती

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील


पुढील बातमी
इतर बातम्या