क्रिस्टल टॉवर आग: स्वरक्षणाचे धडे आले कामी, सहावीच्या विद्यार्थिनीने वाचवले १७ जणांचे प्राण

आपत्कालीन घटनांना सामोरे जाण्यासाठी सध्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. याच शिक्षणाचा पुरेपुर वापर करत बुधवारी एका ११ वर्षीय मुलीने परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या इमारतीमधून तब्बल १७ जणांचे प्राण वाचवले आहेत. झेन सदावर्ते असं या मुलीचं नाव असून ती डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूल या शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे.

कसे वाचवले प्राण?

परळमधील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर बुधवारी सकाळी ८.४५ सुमारास भीषण आग लागली. इमारतीमध्ये आग लागल्याचं समजताचं झेननं घरातील कपडे जमवून फाडले आणि ते पाण्यात भिजवले. पाण्यात भिजवलेले ओले कपडे झेननं कुटुंबीयांना दिले आणि नाकाशी धरून श्वासोच्छवास करण्यास सांगितलं. त्याचप्रमाणं आगीतून बाहेर पडताना केस ओले करण्याचा सल्लाही तिनं कुंटुंबीयांसह शेजाऱ्यांना दिला.

सूचनांचं पालन

झेनच्या या सल्ल्याचं रहिवाशांनी तंतोतंत पालन केलं आणि इमारतीमधील १७ जण सुखरूपरित्या इमारतीतून बाहेर पडले. अन्यथा आगीत अडकून वा धुरामध्ये श्वास काेंडून या रहिवाशांच्या जीवावरही बेतलं असतं.

कशामुळे जीव वाचला?

आग लागल्यास धुरातील कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळं ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळं श्वास गुदमरू लागतो. परंतु अशावेळी नाकाला ओला कपडा लावून श्वास घेतल्यास धुरातील कार्बन ओल्या कापडात शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होतो.


हेही वाचा-

क्रिस्टल टाॅवर आग: धुरानं केला आईचा घात

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत चौघांचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या