Advertisement

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत चौघांचा मृत्यू


परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत चौघांचा मृत्यू
SHARES

परळमधील क्रिस्टल टॉवरच्या 12 व्या मजल्यावर बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत चौघांचा मृत्यू झाला. या चौघांपैकी दोघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला तर 12 ते 15 जण जखमी झाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या ही आग आटोक्यात आली आहे. 


आग लागली तेव्हा या इमारतीत अनेक रहिवासी अडकले होते. दरम्यान धुरामुळे श्वास गुदमरू लागल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर आगीत जखमी झालेल्या 16 जणांना केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यामध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

या आगीत मृत्यू झालेल्या चौघांपैकी दोघांची ओळख पटली असून बबलू शेख (36) आणि शुभदा शेळके (62) अशी त्यांची नावे आहेत. मात्र इतर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.


या इमारतीत नियमाचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.  


12 व्या मजल्यावर आग

या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर सर्वप्रथम सकाळी 8:45 वाजेच्या दरम्यान आग लागली. रहिवासी काही हालचाल करणार तोच क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केलं. दरम्यान रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचरण केलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या, वॉटर टँकर आणि 4 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात यश आलं आहे.


परळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर क्रिस्टल ही इमारत असून काही महिन्यांपूर्वीच या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आहे. ही रहिवासी इमारत आहे. आग लागली तेव्हा या इमारतीत 30 जण अडकले होते. मात्र अग्निशन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझली असून इमारतीत अडकलेल्यांपैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तर धुरामुळे अडकलेल्या रहिवाशांचा श्वास गुदमरू लागल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  


कशी लागली आग?

या इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाला आग विझवण्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी पोलिसांनी परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आली. तर पार्किंगमधील गाड्या रस्त्यांवरून हलवण्यात आल्या. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.


बिल्डरविरोधात कारवाई होणार?

2013-14 मध्ये सुपारीवाला बिल्डरने क्रिस्टल इमारतीचं बांधकाम केलं होतं. या इमारतीकडे महापालिकेची ओसी (भोगवटा प्रमाणपत्र)  नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या इमारत विभागाने 2016 मध्ये ओसी नसल्याची नोटीस पाठवली होती. मात्र तरीही बिल्डरने त्यावर हालचाल केली नाही. त्यामुळे सुपारीवाला बिल्डरविरोधात मुंबई फायर ब्रिगेड अॅक्टनुसार कारवाई होणार असल्याचं समजतं.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा