मुंबईतील ९० टक्के इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची?

परळमधील आग लागलेल्या क्रिस्टल टाॅवरमधील रहिवाशांनी इमारतीत अग्निरोधक यंत्रणा नसल्याचा धक्कादायक दावा केला असला, तरी अग्निशमन दलानं या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा होती, पण ती कामच करत नसल्याचं म्हटलं आहे. ही गोष्ट एकट्या क्रिस्टल टाॅवरची नाही, तर मुंबईतील ९० टक्के इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त वा वापरण्यायोग्य नसल्याचा दावाही तज्ज्ञांनी केला आहे. सोसायटी, बिल्डर आणि रहिवाशांच्या दुर्लक्षामुळंच आगीच्या दुर्घटना घडत असल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.

तर ओसीच नाही?

नियमानुसार मुंबईतील प्रत्येक निवासी-अनिवासी इमारतींना अग्निरोधक यंत्रणा बसवणं बिल्डरांना बंधनकारक आहे. अग्निरोधक यंत्रणा लावल्याशिवाय अग्निशमन दलाकडून इमारतींना ना हरकत प्रमाणपत्रच मिळत नाही. अग्निरोधक यंत्रणांची देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी सोसायटीवर असते. प्रत्येक ६ महिन्याला सोसायटीनं फायर सेफ्टी आॅडिट करत त्याचा अहवाल मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याला सादर करणं आवश्यक आहे.

नियमांकडे दुर्लक्ष

या अहवालानुसार अग्निरोधक यंत्रणेत काय त्रुटी आहेत त्या तपासत त्यानुसार आवश्यक त्या सुधारण करून घेण्याची जबाबदारी अग्निशमन दलाची असते. हे सर्व नियम असताना या नियमांचं पालन सोसायटी आणि अग्निशमन दलाकडून होत नसल्याचा धक्कादायक दावा 'बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया'चे सदस्य आनंद गुप्ता यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला.

सोसायटींवर अंगुलीनिर्देश

निवासी-अनिवासी इमारतींसाठी अग्निरोधक यंत्रणा बंधनकारक असून ही यंत्रणा असल्याशिवाय प्रोजेक्ट कम्प्लिशन सर्टीफिकेट मिळत नाही. त्यामुळं ९९ टक्क्यांहून अधिक बिल्डर अग्निरोधक यंत्रणा बसवतातच. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत बिल्डर या नियमांचं उल्लंघन करत असतील, असं सांगत गुप्ता यांनी सोसायट्यांकडून अग्निरोधक यंत्रणेची देखभाल दुरूस्ती होत नसल्याचा दावा केला.

कारवाईकडेही दुर्लक्ष

प्रत्येक ६ महिन्यांला यंत्रणांची तपासणी करत त्यासंबंधीचा अहवाल अग्निशमन दलाकडे सादर करणं बंधनकारक असताना मुंबईतील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत सोसायट्याही या नियमांचं पालन करत नसल्याचं गुप्ता यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजच्या घडीला मुंबईतील ९० टक्के इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरत असून हेच क्रिस्टल आगीमधून समोर आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दर ६ महिन्यांनी फायर आॅडिट न करणाऱ्या सोसायट्यांविरोधात अग्निशमन दलाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं.

यंत्रणा हाताळायची कशी?

महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनीही मुंबईतील सोसायट्या अजूनही अागीच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचं म्हणत अग्निरोधक यंत्रणांची देखभाल-दुरूस्ती सोसायट्यांकडून होत नसल्याचं स्पष्ट केलं. वाॅचमन, सुरक्षा रक्षक आणि लिफ्टमन यांना या यंत्रणेबाबतची माहिती नसते, ती यंत्रणा कशी हाताळायची याचं प्रशिक्षण दिलं जात नाही.

त्रुटींवर बोट

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आत याव्यात यासाठी इमारतींच्या चारही बाजूला ६ मीटरची जागा सोडणं बंधनकारक असतं. त्यानुसार बिल्डरांकडून ६ मीटरची जागा सोडली जाते. पण या जागेवर रहिवाशांकडून गाड्या लावल्या जातात नि मग अग्निशमन दलाच्या अडचणा वाढतात असं सांगत गुप्ता यांनी अनेक त्रुटींवर बोट ठेवलं आहे.

मुंबईत ९० टक्के नव्हे, तर त्याहून जास्त इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त अाहे. हे मुंबईतील वास्तव आहे. अग्निशमन दलाकडे अपुरं मनुष्यबळ असलं, तरी लवकरच आम्ही अशा इमारतींची तपासणी करणार आहोत.

- प्रभात रहांगदळे, चीफ फायर आॅफिसर

१० हजार इमारतींना ओसी नाही

दरम्यान क्रिस्टल टाॅवरमधील अग्निरोधक यंत्रणाही कुचकामी असल्याचं निदर्शनास आलं असून इमारतीला ओसी नसल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे याला बिल्डर दोषी आहे हे मान्य करतानाच तज्ज्ञांनी सोसायटी आणि प्रशासकीय यंत्रणांना जबाबदार ठरवत या सर्वांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. अशी कडक कारवाई झाली तर नक्कीच सर्वांकडूनच नियमाचं, कायद्याचं पालन होईल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला.

मुंबईतील ९० टक्के अग्निशमन यंत्रणा कुचकाम ठरत असतानाच दुसरीकडे मुंबईतील अंदाजे १० हजार इमारतींना ओसी नसल्याची माहिती प्रभू यांनी दिली आहे. त्यामुळे ओसीचा प्रश्नही महापालिका आणि बिल्डरांनी त्वरीत मार्गी लावत रहिवाशांना दिलासा द्यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा-

क्रिस्टल टॉवर आग: स्वरक्षणाचे धडे आले कामी, सहावीच्या विद्यार्थिनीने वाचवले १७ जणांचे प्राण

क्रिस्टल टाॅवर आग: 'त्याच्या' ईदच्या शुभेच्छा ठरल्या अखेरच्या


पुढील बातमी
इतर बातम्या