क्रिस्टल टाॅवर आग: 'त्याच्या' ईदच्या शुभेच्छा ठरल्या अखेरच्या

बकरी ईद असल्यानं समोरच्या इमारतीत राहणारा बबलू शेख दरवर्षीप्रमाणं यंदाही अझरूद्दीन अली शेख याला ईदच्या शुभेच्छा देऊन आपल्या घरी जात होता. बबलूच्या यंदाच्या शुभेच्छा मात्र अखेरच्या ठरल्या.

SHARE

परळच्या एफ दक्षिण कार्यालयासमोरील क्रिस्टल टाॅवर या १६ मजली इमारतीतील १२ व्या मजल्याला बुधवारी २२ ऑगस्टला सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत शुभदा शिर्के (६२) बबलू शेख (३६), अशोक संपत, संजीव नायर या चौघांचा मृत्यू झाला. कोणाचाही मृत्यू हा वेळ काळ सांगून येत नाही. असंच काहीस घडलं ते बबलू शेख आणि अशोक संपत यांच्यासोबत.....


पायऱ्यांवर गुदमुरून मृत्यू

बकरी ईद असल्यानं समोरच्या इमारतीत राहणारा बबलू शेख दरवर्षीप्रमाणं यंदाही अझरूद्दीन अली शेख याला ईदच्या शुभेच्छा देऊन आपल्या घरी जात होता. यावेळी अचानक शॉट सर्किटमुळं इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली. या आगीनं क्षणात रौद्र रूप धारण केल्याने बबलूचा इमारतीच्या पायऱ्यांवर गुदमुरून मृत्यू झाला. दरवर्षी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येणारा बबलूच्या यंदाच्या शुभेच्छा मात्र अखेरच्या ठरल्या.


लिफ्टमध्ये अंत

इमारतीच्या बाजूला राहणारे अशोक संपत यांचे आई-वडील या इमारतीच्या १६ व्या मजल्यावर राहत होते. आग लागल्याचं वृत्त समजताच त्यांनी लगेचच क्रिस्टल टॉवरजवळ धाव घेतली. विशेष म्हणजे त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना न जुमानता ते त्यांच्या आई-वडिलांना वाचवण्यासाठी लिफ्टमधून वर गेले. पण त्यांची लिफ्ट १२ व्या मजल्यावरच थांबली आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.


अशी पटली दोघांची ओळख

या घटनेत दोन जणांचा आगीत होरपळून आणि दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटावी म्हणून नातेवाईक आणि डॉक्टर अतोनात प्रयत्न करत होते. शुभदा शिर्के व बबलू शेख यांचे मृतदेह इमारतीच्या पायऱ्यांवर सापडल्यांने त्यांची ओळख तात्काळ पटली होती. परंतु दोन मृतदेह लिफ्टमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं त्यांच्या मृतदेहांची ओळख पटण्यास थोडा वेळ लागला. त्यानंतर अखेर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अशोक संपत यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या दात व बेल्टवरून केली. तर संजीव नायर यांच्या मृतदेहाची ओळख घड्याळ व खिशात सापडलेल्या आयडी कार्डवरून करण्यात आली.


या आगीत जखमी झालेल्या २१ जणांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यात १६ पुरूष व ५ स्त्रियांचा समावेश असून त्यातील दोघांना श्वास घेण्यास त्रास होतं आहे. त्यातल्या दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून इतर जखमींना सकाळपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल.
- डॉ अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालयहेही वाचा - 

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत चौघांचा मृत्यू

क्रिस्टल टॉवर आग: स्वरक्षणाचे धडे आले कामी, सहावीच्या विद्यार्थिनीने वाचवले १७ जणांचे प्राण

क्रिस्टल टाॅवर आग: धुरानं केला आईचा घात
संबंधित विषय
ताज्या बातम्या