भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४० वर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेत आणखी आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे बुधवारी मृतांची संख्या ४० वर पोचली आहे. मृतांमध्ये १५ मुलांचा समावेश असून दोन ते १५ वर्षे वयोगटातील मुलं असल्याचे पोलिसांनी सांगितलं.  आतापर्यंत २५ जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना भिवंडी आणि ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भिवंडीत सोमवारी पहाटे ३.४० वाजता ४३ वर्षांची तीन मजली जिलानी इमारत कोसळली. आतापर्यंत ४० जणांचा यामध्ये बळी गेला आहे. मुसळधार पाऊस असूनही मंगळवारी रात्री शोध मोहीम सुरूच होती.  ५० तासांपेक्षा जास्त काळ मलब्यात असलेले मृतदेह काढण्यात आले असून ते अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. या इमारतीत ४० फ्लॅट होते आणि येथे १५० लोक राहत होते. या प्रकरणी पालिकेच्या दोन अधिका्यांना निलंबित करण्यात आले असून इमारतीच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतील इमारत दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आपत्ती मदत पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. वडेट्टीवार यांनी सांगितलं की, 'जर ही इमारत लीगल असेल, तर मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत देखील करण्यात येईल. तसेच जखमींना पन्नास हजार रुपये देखील जाहीर करण्यात आले आहेत.

शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. मात्र ३५ वर्षात खरंतर इमारत कोसळायला नको होती, परंतु इमारत कोसळली आहे. त्यामुळे नोटीस देऊन देखील त्यांनी इमारत रिकामी का केली नाही? याचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार येईल.', असं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

भिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या