Advertisement

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू


भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू
SHARES

भिवंडी परिसरात ३ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३.४० वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. भिवंडीतील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या इमारतीत २५ कुटुंब वास्तव्यास होते. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास १४-१५ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २०-२५ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पटेल कंपाऊंड येथील ही इमारत सुमारे 30 वर्षे जुनी एल टाइपमधील होती. या इमारतीला महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केले होते. या इमारतीस २ वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही अनेक नागरिक या ठिकाणी राहत होते. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा