झोपडपट्टीतील पहिला मजला पात्र करा, गोपाळ शेट्टी यांची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

झोपडपट्टीवायसियांना हक्काचं पक्क घर मिळवून देण्याकरीता झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा (SRA)मार्फत पुनर्विकास योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत झोपडपट्टीतील पहिला मजला पात्र करुन तेथील रहिवाशांना एसआरए योजनेत सामावून घेण्यात यावं, अशी मागणी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. यासंदर्भात शेट्टी यांनी नुकतीच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन चर्चा केली.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका बाजूला टोलेजंग उंच इमारती दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या आणि चाळी दिसतात. मुंबईतील ६०-७० टक्क्यांहून अधिक जनता ही झोपडपट्टी, चाळी आणि बैठ्या घरांमध्ये राहते. झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचं घरं हीच त्याच्यासाठी मोठी संपत्ती असते. कुटुंबाच्या वाढत्या गरजेनुसार आणि आकारमानानुसार जागा कमी पडू लागल्याने बहुतेक रहिवासी आपल्या मूळ घरावर एक मजला बांधून राहू लागले आहेत. परंतु ज्या वेळेत संबंधित ठिकाणि एसआरए योजना राबवली जाते, तेव्हा रहिवाशांना या वाढीव जागेचा लाभ मिळत नाही. या बाबीकडे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लक्ष वेधलं आहे. 

हेही वाचा - पुनर्विकासाला मिळणार गती, मुंबई महानगर क्षेत्रासाठी आता वेगळं एसआरए

एखाद्या झोपडीधारकाने कुटुंबाच्या गरजेनुसार आपल्या झोपडीवर एक मजला बांधला असेल आणि हा मजला २००० साला आधीच बांधलेला असेल, तर नियमानुसार एसआरए योजनेअंतर्गत या वाढीव घराचा लाभ देखील झाेपडधारकाला दिला पाहिजे, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. गोपाळ शेट्टी यांनी यासंदर्भात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन चर्चा देखील केली. 

त्याआधी गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पत्र लिहून झोपडपट्टी पुनर्विकास प्रक्रियेतील नियमांत दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. या मागणीत त्यांनी झोपडीधारकाच्या पहिल्या मजल्याचाही पुनर्विकास प्रक्रियेत समावेश करण्यात यावा, अशी सूचना केली. असंच एक पत्र गोपाळ शेट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लिहिलं होतं.  

दरम्यान, सर्वसामान्य गरीब माणसाच्या घरांचं स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रात देखील झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

हेही वाचा - धारावी पॅटर्नची वॉशिंग्टन पोस्टकडून दखल, पालिकेचं केलं कौतुक

पुढील बातमी
इतर बातम्या