शिवशाही स्लिपर कोच बसचं तिकीट होणार कमी

राज्यात वाढलेल्या खासगी बसच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी एसटी महमंडळानं आपल्या ताफ्यात शिवशाही बस आणल्या खऱ्या; परंतु शिवशाहीच्या एसी स्लिपर कोचचं भाडं जास्त असल्यामुळं प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळं एसटी महामंडळानं एसी शिवशाहीचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून एसटीच्या संचालक मंडळानंही तिकीट दर कमी करण्याला मंजूरी दिली आहे.

सध्या हा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे (एसटीए) पाठविण्यात आला आहे. त्यामुळं, लवकरच प्रवाशांना शिवशाहीच्या एसी बसमधून कमी तिकीट दरात प्रवास करता येणार आहे.

खासगी बसला प्राधान्य

खासगी बसचे तिकीट दर शिवशाहीच्या तिकीट दरांपेक्षा कमी आहे. रात्रीच्या वेळेस प्रवास करायचा असल्यास प्रवासी स्लिपर कोचला प्राधान्य देतात. परंतु शिवशाहीच्या सुटण्याची आणि पोहोचण्याच्या वेळा प्रवाशांसाठी गैरसोयीच्या असल्याने प्रवासी शिवशाहीतून प्रवास करण्याचं टाळतात.

वेळ गैरसोईची

शिवशाही बस संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत चालवल्या जातात. या वेळेत स्लिपर कोचनं प्रवास करणारी प्रवासी क्षमता कमी असते. त्यामुळं शिवशाहीच्या एसी स्लिपर बसच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्याचप्रमाणं, शिवशाहीच्या एसी बस ज्या मार्गांवर चालवल्या जातात, त्या मार्गांवर देखील प्रवासी संख्या कमी आहे.

प्रवासी वाढण्याची अपेक्षा

याचा शिवशाहीला फटका बसत असल्याने एसटीच्या वाहतूक शाखेनं शिवशाहीचे तिकीट दर कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ७४ एसी स्लीपर शिवशाही बस असून राज्यातील ३६ मार्गांवर त्या चालवण्यात येत आहेत. शिवशाहीच्या स्लिपर बसचं तिकीट कमी झाल्यावर प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी महामंडळाची अपेक्षा आहे.


हेही वाचा-

मस्जिद स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला

Good News: एसटी कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी ६ महिन्यांची रजा


पुढील बातमी
इतर बातम्या