बेस्टचं 'ती शौचालय' सुरू होणार दक्षिण मुंबईत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बेस्ट उपक्रमाकडून मुंबईतील महिलांसाठी शौचालयाची सुविधा पुरवण्यात येत आहे. या शौचालयासाठी बेस्टच्या भंगारात काढलेल्या बसचा वापर करण्यात येणार आहे. बसगाड्यामध्ये स्वच्छतागृह तयार करण्यास महापालिका सभागृहानं मान्यता दिल्यानंतर आता बसगाडीतील पहिलं शौचालय तयार करण्यात येणार आहे. मरिन ड्राइव्ह येथील तारापोरवाला मत्स्यालयाजवळ हे सशुल्क शौचालय सुरू करण्यात येणार आहे.

महिलांसाठी शौचालय

‘ती शौचालय’ अशा संकल्पनेअंतर्गत सर्व सोयीसुविधांनीयुक्त असं हे स्वच्छतागृह असणार आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी हे शौचालय असणार आहे. त्यामुळं दक्षिण मुंबईत जाणाऱ्या महिलांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत दररोज लाखो लोक कामानिमित्त येत असतात. वाढत्या लोकसंख्येला पुरेशी शौचालये मुंबईत नसल्यामुळे अनेकांची गैरसोय होते. त्यात सर्वाधिक कुचंबणा महिलांची होते.

रुग्णांना प्रचंड त्रास

महापालिकेनं पदपथावर बांधकामं उभारू नयेत असं धोरण तयार केलं आहे. त्यामुळं रस्त्याच्याकडेला शौचालयं उभारली जात नाही आहेत. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर व अन्य लहान रस्त्यांवर सार्वजनिक शौचालयांची सोय नसल्यानं वृद्ध नागरिकांना आणि मधुमेहाच्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

फिरती स्वच्छतागृहं

महिलांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बेस्टच्या भंगार गाड्यांमध्ये फिरती स्वच्छतागृहं तयार करून महामार्ग, हमरस्ते, लहान-मोठ्या गर्दीच्या रस्त्यांवर पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही जुन्या बसगाडीत स्वच्छतागृह तयार करावं, अशी मागणी नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या मागणीला काँग्रेसने विरोध केला.

काँग्रेसची भूमिका

बेस्टच्या गाड्या जुन्या झाल्या तरी बेस्टला मुंबईच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये शौचालय नको, अशी काँग्रेसची भूमिका होती. परंतु, कॉंग्रेसच्या विरोधानंतरही पालिका महासभेत ही मागणी मंजूर करण्यात आली. त्यानुसार बेस्ट बसगाडीतील पहिले वहिले शौचालय मुंबईत तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता घनकचरा विभागानं आराखडा तयार केला आहे.

महसूल पालिकेला

पुण्यातील एका संस्थेलाच हे स्वच्छतागृह चालवण्याचे काम देण्यात आले आहे. हे शौचालय वापरण्याकरिता ५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच बसगाड्यांवर जाहिरात करता येणार असून, त्यातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी ९० टक्के महसूल कंत्राटदाराला तर १० टक्के महसूल पालिकेला मिळणार आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून ते अनेक सोयीसुविधांनी युक्त असेल. जागा, पाणी आणि वीज पालिकेतर्फे पुरवले जाणार आहे.

महिलांसाठी उपयुक्त वस्तू

या स्वच्छतागृहाच्या मागील भागात महिलांसाठी उपयुक्त वस्तू विकण्यासही परवानगी दिली जाईल. मात्र त्याकरिता पालिकेच्या संबंधित विभागाचा परवाना घ्यावा लागेल. या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित संस्थेवर असणार आहे.


हेही वाचा -

'जेएनयू'मधील आंदोलनाचे मुंबईत पडसाद

शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; संजय निरुपम


पुढील बातमी
इतर बातम्या