शेतकरी मोर्चेकऱ्यांना आझाद मैदान परिसरात सार्वजनिक शौचालय नि:शुल्क

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी मुंबई महापालिकेकडून विशेष व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. या र्मोचेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, तसेच मोबाईल टॉयलेटचीही व्यवस्था आझाद मैदान परिसरात करण्यात आली आहे. या परिसरातील सार्वजनिक शौचालयांमध्येही मोर्चेकऱ्यांना नि:शुल्क सेवा देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या सूचना शौचालय चालवणाऱ्या संस्थांना देण्यात आल्या आहेत. ही सेवा सेवा रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस नि:शुल्क असेल.

शौचालय आणि पिण्याचे पाणी

संपूर्ण कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी नाशिकवरून निघालेला महाराष्ट्र किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्च रविवारी मुलुंडवरून निघत विक्रोळी मार्गे शीव-चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात स्थिरावणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा हा लाँग मार्च सोमवारी दुपारी मंत्रालयावर धडकणार असून या मार्चला आझाद मैदानाजवळ अडवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नागरी सुविधा म्हणून पिण्याच्या पाण्यासह मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

सहायक आयुक्त किरण दिघावकर

मैदान परिसरात ४० मोबाईल टॉयलेट

आझाद मैदान परिसरात सध्या २० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली असून रात्रीपर्यंत ही संख्या ४०पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी ४ पाण्याच्या टँकरचीही व्यवस्था केली आहे. याठिकाणी पाणी भरणा केंद्र जवळच असल्यामुळे पाणी संपल्यास तो टँकर त्वरीत भरुन पुन्हा उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दोन रूग्णवाहिकांची व्यवस्था

मराठा मोर्चासाठी महापालिकेकडून आरोग्य शिबिर आयोजित केले होते. परंतु, हा मोर्चा तेवढा मोठा नसल्यामुळे सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा

चर्चा करू, पण आंदोलन सुरूच राहणार; शेतकऱ्यांचा निर्धार

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चसाठी मुंबईतील वाहतुकीत बदल

पुढील बातमी
इतर बातम्या