कामगार रुग्णालय आग: मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये द्या - खासदार गजानन किर्तीकर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयात सोमवारी झालेल्या अग्नितांडवात एका दोन महिन्याच्या चिमुकलीसह आठ जणांचा मृत्यू झाला असून १७७ जण जखमी झाले आहेत. केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवाल यांनी मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची, गंभीर जखमींना २ लाख रुपये तर किरकोळ जखमींना १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा कूपर रुग्णालयात केली होती. परंतू, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी स्थानिक खासदार गजानन किर्तीकर यांनी केली आहे. किर्तीकर यांनी मंगळवारी कामगार रुग्णालयाला भेट दिली. 

शॉर्ट सर्किटमुळे अाग?

मरोळ भागात असलेल्या या कामगार रुग्णालयात नवीन इमारतीचे काम सुरू आहे. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात अाहे. नव्या इमारतीच्या तळ मजल्यावरच्या गोदामात भंगार साहित्य ठेवण्यात येते. या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी रात्री आग लागली. आणि अवघ्या काही मिनिटात तळमजल्यावरील आगीचा धूर चौथ्या मजल्यापर्यंत पसरत गेला, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून अग्निशामक दलही कसून चौकशी करत आहे. 

दुर्दैवी घटना

या आगीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून दुर्घटनेनंतर केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी कामगार रुग्णालयाला भेट दिली. ही  दुर्दैवी घटना असून याची चौकशी राज्य सरकार करत असून राज्य सरकारने याबाबतचा अहवाल लवकरात लवकर द्यावा, असं गंगवार यांनी म्हटलं. गंगवार यांनी कूपर, सेव्हन हिल्स, होली स्पिरिट या रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जार्इल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. 

आगीची चौथी घटना

कामगार रुग्णालयात या अगोदर सहा महिन्यात तीन वेळा लहान आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला वारंवार लेखी तक्रारी करूनही  दखल घेण्यात आली नाही. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराबद्दल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आवारात निदर्शने केली. रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या नसून या उपाययोजना अगोदरच झाल्या असत्या तर एवढी मोठी आगीची दुर्घटना टाळता आली असती. रुग्णालयातील एक हजार कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न असून प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी फलक फडकावून आंदोलन केले.


हेही वाचा - 

कामगार रुग्णालय आग: मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत

कामगार रुग्णालयातील आगीत ८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश


पुढील बातमी
इतर बातम्या