Electricity bill: गुड न्यूज! आता विजेचं बिल भरता येईल हप्त्यांमध्ये

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्रात लाॅकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर हळुहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यानुसार वीज कंपन्यांनी देखील मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचं वीजबिल देण्यास सुरूवात केली आहे. परंतु आर्थिक अडचणीत असलेल्या अनेकांना विजेचं बिल कसं भरायचं? अशी चिंता देखील सतावू लागली आहे. अशा वीज ग्राहकांना दिलासा (electricity bill in installments) देण्यासाठी महावितरणकडून सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज ग्राहकांना स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल. त्यानुसार ग्राहकांना वीज बिल भरता येईल,अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

बिल पडताळणीसाठी लिंक

महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा दंड किंवा भार महावितरणच्या ग्राहकांवर लादण्यात आलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिलं ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रनुसारच आहेत. कुणाला वीज बिलाबद्दल शंका असल्यास महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या   https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर क्लिक करून वीज ग्राहक आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतील. एवढंच नाही, तर महावितरणच्या कार्यालयातही येऊन देखील ग्राहकांना वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचं वीजबिल गेलं असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही देखील ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

हेही वाचा - मुंबईकरांनो तयार रहा, विजेचं बिल वाढण्याची शक्यता

कुणावरही भुर्दंड नाही

डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणला वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आलं नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आलं. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतः हून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. 

या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्यानं स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसंच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचं समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाच्या दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितलं.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - 'या' झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले

पुढील बातमी
इतर बातम्या