आता ‘झोमॅटो’द्वारे घरपोच मिळणार किराणा सामान

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं राज्यात संचारबंदी लागू केली असून, जिवनाश्यक वस्तूंची दुकांन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किराणा साहित्याची दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळं किराणा खरेदी करण्याच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्या मंडळींना रोखण्याकरिता आता दादर, माहीम, धारावी भागांत प्रायोगिक तत्त्वावर झोमॅटोच्या माध्यमातून रहिवाशांना किराणा साहित्य घरपोच देण्याची शक्कल महापालिकेनं लढविली आहे.

राज्यात टाळेबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यात आली  आहेत. त्यामुळं आता नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या निमित्तानं घराबाहेर पडू लागले आहेत. किराणा मालाच्या दुकानात प्रचंड गर्दी करीत आहेत. भाजी खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही झुंबड उडत आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं आता नवी शक्कल लढविली आहे. 

दादर, माहीम आणि धारावी परिसरामध्ये प्रायोगिक तत्वावर झोमॅटोच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरी किराणा साहित्य पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी या परिसरातील किराणा मालाची दुकाने आणि झोमॅटो यांच्यामध्ये करार करण्याचे प्रयत्न महापालिकेनं सुरू केले आहेत. या परिसरातील किराणा मालाच्या दुकानांची यादी बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही अधिकारी दुकानदारांबरोबर चर्चा करीत असून किराणा साहित्य रहिवाशांच्या घरी पोहोचते करण्यासाठी दुकानदार आणि झोमॅटो यांच्यामध्ये करार करण्यात येणार आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये उभयतांमध्ये करार झाल्यानंतर ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे. एकदा का ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाइलवरील अ‍ॅपद्वारे झोमॅटोला हव्या त्या किराणा साहित्याची यादी पाठविल्यानंतर काही वेळातच ते घरपोच होऊ शकेल. त्यामुळं किराणा दुकानांमध्ये होणारी गर्दी टाळणं शक्य होणार असून, करोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही दूर होणार असल्याचं समजतं.


हेही वाचा -

लॉकडाऊनदरम्यान दुकानदारांचा सर्वांनाच विसर - दुकानदार

१४ एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी


पुढील बातमी
इतर बातम्या