कल्याण : सोसायटीत भीषण आग, घर जळून खाक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कल्याणमधील उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असणाऱ्या गोदरेज हिल परिसरातील एका सोसायटीमध्ये घराला मोठी आग लागली. यामध्ये संपूर्ण फ्लॅटचे नुकसान झाले आहे. पण अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील टेकडीवर एकोरिना-कॅसोरीना नावाची मोठी सोसायटी आहे. यातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त घराला आग लागली. बेडरूममध्ये असणाऱ्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ती आग संपूर्ण घरात पसरल्याची प्राथमिक माहिती आहे.

आग लागली तेव्हा घरामध्ये काही सदस्यही उपस्थित होते. आगीनं अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करीत संपूर्ण घराला विळखा घातला. ही आग एवढी मोठी होती की घराच्या गॅलरीतून वरच्या गॅलरीपर्यंत पसरू लागली. मात्र अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्यानं ही आग इमारतीमध्ये पसरू शकली नाही आणि मोठा धोका टळला.

सोसायटीत अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याची माहितीही समोर येत आहे. याबाबत अग्निशमन विभागाकडून संबंधित सोसायटीला नोटीस बजवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

दिवसभरातील ही दुसरी आगीची घटना आहे. मुंबईतल्या साकिनाका परिसरातील झोपडपट्टींना देखील भीषण आग लागली होती. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मात्र काही झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. 


हेही वाचा

साकिनाका परिसरातील झोपडपट्टींना भीषण आग

मध्य रेल्वेची लगेज पिकअप सर्व्हीस; प्रवासाआधी बॅगा करा पार्सल

पुढील बातमी
इतर बातम्या