कर्नाटकातील हिजाबच्या वादावरून वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय पक्षांना त्यांच्या स्वार्थासाठी आंदोलन करू नये किंवा शांतता भंग करू नये असं आवाहन केलं आहे. इतर राज्यांमध्ये सुरू झालेल्या वादावर राज्यात आंदोलने करणे अयोग्य असल्याचं पाटील यांचं म्हणणं आहे.
मी लोकांना आवाहन करतो की, अशा मुद्द्यांवर विनाकारण आंदोलन करू नका. ही घटना दुसऱ्या राज्यात घडली आहे, त्याचा इथे निषेध करू नये. मी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो, असं ट्विट महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
आंदोलनं करणं हे राज्याच्या तसंच जनतेच्या हिताचं नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.
पाटील यांचे मत आहे की, विद्यार्थी जेव्हा शाळा किंवा महाविद्यालयात जातो तेव्हा शिक्षणाला मुख्य प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येकानं संबंधित शैक्षणिक संस्थांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करावं, असं त्यांचं मत आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनं मंत्र्याचा हवाला देऊन सांगितलं की, महाराष्ट्र पोलीस यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत आणि राज्यात परिस्थिती सामान्य राहावी यासाठी पावले उचलत आहेत.
याआधी बुधवारी, ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा शाळा/महाविद्यालयांमध्ये विहित गणवेश असतो तेव्हा त्याचे पालन केले पाहिजे. केवळ शिक्षण केंद्रांवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक किंवा राजकीय विषय आणू नयेत, असं ठाकरे यांचं मत आहे.
या वादात मुंबईतील मदनपुरा आणि भिवंडीत हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
हेही वाचा