आयएनएस विराट जाणार भंगारात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

 आयएनएस विराट या विमानवाहू नौकेचा अखेर लिलाव होणार आहे. ऑनलाइन बोलीद्वारे लिलाव करून आयएनएस विराट भंगारात काढण्यासाठी कंत्राट दिलं जाणार आहे.  त्यानुसार डिसेंबरमध्ये आयएनएस विराटचा लिलाव होणार आहे.

नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झाल्यानंतर आयएनएस विराट मुंबईच्या गोदीत उभी आहे. मूळ ब्रिटीश बनावटीची ही विमानवाहू युद्धनोका १९८७ साली नौदलात दाखल झाली.  २२६.५० मीटर लांबीच्या आयएनएस विराटने श्रीलंकन बंडखोरांविरुद्धची कारवाई तसेच कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी नौदलावर वचक ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१७ मध्ये आयएनएस विराट नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झाली. तेव्हापासून ती कुलाब्यातील नौदल गोदीत आहे. 

अवाढव्य आकाराच्या आयएनएस विराटने गोदीतील मोठी जागा अडवली आहे. यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या नौका उभ्या करण्यास गोदीत जागा अपुरी पडते. त्यामुळे आयएनएस विराटचा लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा आग्रह नौदलाच्या पश्चिम कमांड मुख्यालयाने नौदलामार्फत संरक्षण मंत्रालयाकडे धरला होता. अखेर ही नौका तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

केंद्र सरकारच्या मेटल स्क्रॅब ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून आयएनएस विराटचा लिलाव केला जाणार आहे.  १७ डिसेंबरला दुपारी १२ ते ४ दरम्यान हा लिलाव होईल. 'विराट'च्या लोखंडाचा विशिष्ट भाग हवा असणाऱ्यांनी  ५.३० कोटी रुपये जमा करून या ऑनलाइन लिलावात सहभागी होता येणार आहे. लिलावात सहभागी कंपनी नौकेला भंगारात काढण्याचे कंत्राट मिळणार आहे. आयएनएस विराटची संबंधित कंपन्यांना १६ डिसेंबरपर्यंत आगाऊ सूचनेसह पाहणीदेखील करता येणार आहे. 


हेही वाचा - 


पुढील बातमी
इतर बातम्या