मुंबईची लाईफलाईन सध्या डेथलाईन बनत चालली आहे. रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे लोकल पकडताना अनेक प्रवासी जखमी होतात. तसंच, काही प्रवासी विविध आजारांनी त्रस्त असतात. अशा प्रवाशांवर वेळेत उपचार न केल्यास त्यांच्या आजारात वाढ होण्याची शक्याता असते. त्यामुळं प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी, मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर लीलावती रुग्णालयातर्फे 'आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र' सुरू करण्यात येत आहे.
दादर स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्रामध्ये अनुभवी डॉक्टरांचे पथक कार्यरत असणार आहे. तसंच या वैद्यकीय केंद्रामध्ये उपचारांसाठी सरकारी दर आकारले जाणार आहेत. सामान्य रुग्णालयात सल्ला घेण्यासाठी १००० ते १५०० शुक्ल आकारला जातो. मात्र, या केंद्रामध्ये रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी फक्त ४०० रुपये आकारले जाणार आहेत. हे केंद्र शुक्रवार ८ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
पहिल्यांदाच एक खासगी रुग्णालय मध्य रेल्वेवर आपले आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करत आहे. तसंच या केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला ४ लाख रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. त्याचप्रमाणं या केंद्रातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ज्या रुग्णांना रुग्णालयात भर्ती करण्याची गरज असल्यास त्या रुग्णांना लीलावती रुग्णालयात किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तसंच, काही रुग्णांना आर्थिक परिस्थीतीमुळे उपचारांचा खर्च उचलता येत नाही, अशा रुग्णांची नि:शुल्क देखभाल करण्यात येणार आहे.
हेही वाचा