मुंबईत लोकलसेवेचा खेळखंडोबा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सातत्याने विलंबाने (delay) धावणाऱ्या लोकलमुळे (mumbai local) प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने याचा जाब विचारण्यासाठी प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.

मात्र अधिकाऱ्यांनी निश्चित कालमर्यादा न देता शिष्टमंडळाची केवळ आश्वासनावर बोळवण केली.

अखेर 'लोकल गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा,' असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना दिला आहे.

1 जानेवारीपासून दुपारच्या लोकल फेऱ्या विलंबाने धावणे, ठाणे (thane)-सीएसएमटी (csmt) लोकल फेऱ्या रद्द करणे, गाडीत प्रवाशांना योग्य माहिती न मिळणे या कारणांमुळे लोकल प्रवास अधिक त्रासाचा झाला आहे.

मध्य रेल्वेवरील (central railway) एसी लोकल म्हणजे 'जादा पैसे भरून विकतचे दुखणे' असल्याची प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.

याचा जाब विचारण्यासाठी शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी परिवहन व्यवस्थापक (सीपीटीएम) डॉ. मिलिंद हिरवे आणि वरिष्ठ परिचालन प्रबंधक अनंत शर्मा यांची थेट भेट घेतली.

या बैठकीत मध्य रेल्वेच्या बेशिस्त व्यवस्थापनावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले.

कसारा (kasara) आणि कर्जत (karjat) मार्गावर लोकल रोज अर्धा-अर्धा तास उशिराने धावत असल्याने कार्यालयीन कामकाज, शाळा-कॉलेज, व्यापारी व्यवहार सर्वांचे नियोजन कोलमडते. 

मध्य रेल्वेकडून मेल-एक्सप्रेस गाड्यांना अनावश्यक प्राधान्य देऊन लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडले जाते.

रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असून त्याचा फटका रोज लाखो प्रवाशांना बसत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

'लोकलक्षमता वाढवण्यासाठी 15 डबा लोकल प्रकल्पात फलाटावर काम सुरू आहे. अन्य विकासकामे सुरू असल्याने त्याचा हा परिणाम आहे.

लोकल प्रवाशांच्या समस्या गंभीर असून त्यात टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याच्या विविध उपायांवर काम सुरू आहे,' असे थातूरमातूर उत्तर देऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाची बोळवण केली.


हेही वाचा

मुंबईतील 106 बांधकाम प्रकल्पांना नोटीस

15 महानगरपालिकांचे नेतृत्व महिलांकडे, शिवसेना (UBT)चा आक्षेप

पुढील बातमी
इतर बातम्या