भरतीची वर्दी देणार दादर चौपाटीवरील लाऊडस्पिकर!

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मागील काही दिवसांमध्ये समुद्रात बुडण्याचे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांमार्फत मेगा फोनवरून समुद्र चौपाट्यांवर धोक्याची सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने देखील दादर-शिवाजीपार्क समुद्र चौपाटींवर ध्वनीक्षेपक बसवून पर्यटकांना सूचना देण्यास सुरूवात केली आहे.

धोक्याची सूचना

जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण चौपाटीवर तब्बल १० ध्वनीक्षेपक बसून पर्यटकांना भरतीच्या पाण्याच्या धोक्याची सूचना दिली जात आहे.

भान हरपते दुर्घटना घडते

समुद्राला १२ जुलै ते १६ जुलै या कालावधीत ४.५० मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या लाटांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर चौपाटीवर गर्दी करतात. लाटांच्या पाण्यात भिजताना किंवा खडकावर बसलेल्या प्रेमी युगुलांना अनेकदा भान राहात नाही आणि पुढे दुर्घटना घडतात.

कुठे बसवले ध्वनीक्षेपक?

हे प्रकार रोखण्यासाठीच समुद्राच्या भरतीची माहिती पर्यटकांना देण्यासाठी जी-उत्तर विभागाच्या माध्यमातून किर्ती कॉलेज, सूर्यवंशी हॉल, चैत्यभूमी, हिंदुजा, रोड क्रमांक ५, मकरंद सोसायटी, माहिम दर्गा, रेती बंदर आदी प्रमुख ठिकाणी उंचावर १० ध्वनीक्षेपक बसवण्यात आले आहेत. या ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून समुद्रावर फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना भरतीची माहिती देऊन त्यांना वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीच्या धोक्याची सूचना दिली जात असल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली.


हेही वाचा-

मुंबईच्या रस्त्यांवर उरलेत ३०० खड्डे

लाटांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची समुद्रकिनारी गर्दी


पुढील बातमी
इतर बातम्या