Maharashtra Bandh : काँग्रेस, शिवसेना आणि NCPची प्रदर्शनं, भाजप, मनसेचा विरोध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

११ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सहभागी आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि मनसेनं या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवलं आहे.

महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष या बंदमध्ये सामील होत आहेत. तर भाजप आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं स्पष्ट केलं आहे की, ते या बंदमध्ये सहभागी होत नाहीत आणि या बंदला विरोध करत आहेत.

सोमवारी राष्ट्रवादीचे नेते हुतात्मा चौकात निषेध करण्यासाठी जमतील. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रमुख नेते राज्यपालांच्या निवासस्थानासमोर मूक आंदोलन करतील. त्याचबरोबर शिवसेनेनं या महाराष्ट्र बंदमध्ये सक्रीय सहभाग घेणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.

मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार म्हणाले की, लखीमपूर खेरी इथं घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्हीही त्याचा निषेध करतो. परंतु, महाराष्ट्रात सरकार मधीलच पक्षांनीच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमकं कोणतं लॉजिक आहे कळत नाही.

आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतंय. त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचंय तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायच तरी कोणाकडे ? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालू ठेवावी.

भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र बंदच्या निर्णयाचा निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्ताधारी पक्ष लखीमपूर खेरी घटनेचे राजकारण करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री जयंत पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्र बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या जातील. तसंच दुकानदार आणि इतर व्यापाऱ्यांना महाराष्ट्र बंदमध्ये यशस्वीपणे सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.


हेही वाचा

महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बसवर काय होणार परिणाम? जाणून घ्या...

महाराष्ट्र बंद! जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

पुढील बातमी
इतर बातम्या