तर कडक निर्बंध लावावेच लागतील, मुख्यमंत्र्यांनी दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीय. पण येत्या २ दिवसांत मला दृष्य स्वरूपात फरक दिसला नाही आणि वेगळा पर्याय मिळाला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसं आपल्यालाही करावं लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यातील जनतेला अल्टिमेटम दिला.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार २ एप्रिल रोजी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाॅकडाऊन आणि कडक निर्बंधावरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. 

पार्ट्या, समारंभ सुरू

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा संसर्ग (coronavirus) पुन्हा एकदा वाढतोय. परिस्थिती आटोक्यात आल्यावर मधल्या काळात आपण शिथिलता आणताच लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. कोरोना गेला, अशा रितीने सगळं सुरू होतं. दुर्दैवाने जी भीती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून कोरोना आला आहे. आपण एका कात्रीत सापडलो आहोत. अर्थचक्र चालवायचं, तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ टाळायचा, तर अर्थचक्र थांबतंय. 

हेही वाचा- राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या!, नाना पटोलेंची मागणी

अनेकांचे सल्ले

कडक निर्बंधांवरून सध्या अनेकजण सल्ले देत आहेत, निवेदने पाठवली जात आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल, अशी लॉकडाऊनची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नाही. कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन अंतिम पर्याय नाही. हिटरलसारखे वागू नका. लॉकडाऊन लावायचा तर रोजगाराचे पैसे थेट खात्यात जमा करा. एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊनऐवजी आरोग्यव्यवस्था वाढवा. आपण आरोग्य सुविधाही वाढवतच आहोत. बेड, औषधं, व्हेंटिलेटर्स वाढवता येतील, पण डाॅक्टर, नर्स, आरोग्य यंत्रणा सांभाळणारे तज्ज्ञ कसे वाढवता येतील? फर्निचरचं दुकान म्हणजे हाॅस्पिटल नसतं. 

लसीकरणानंतरही कोरोना

कालच्या दिवसात महाराष्ट्रात ३ लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आलं. पण लसीकरणानंतरही जर कोरोनाचा संसर्ग होत असेल, तर ही साखळी कशी तोडायची. सार्वजनिक ठिकाणची, कार्यक्रम, समारंभातील गर्दी कमी झालेली नाही. परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील. अशा स्थितीत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तुमच्याकडे दुसरा काही पर्याय असेल, तर तो सांगा. येत्या दोन दिवसांत मी प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांशी यावर बोलणार आहे.

तर, वेगळा पर्याय सांगा 

मला वेगळा उपाय हवाय. ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय मिळाला नाही किंवा २ दिवसांत मला दृष्य स्वरूपात फरक दिसला नाही, तर काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही. जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- “‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम फोल; ‘त्यांच्या’ कुटुंबातील व्यक्तींनाच कोरोना”
पुढील बातमी
इतर बातम्या