Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील ३ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून बंद असलेल्या हाॅटेल मालकांना दिलासा देणारा निर्णय ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन अंतर्गत’ सोमवार ६ जुलै २०२० रोजी घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील निवासाची व्यवस्था असलेली हाॅटेल्स ८ जुलैपासून सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु या हाॅटेलांमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ ३३ टक्केच ग्राहकांनाच राहण्याची परवानगी असेल. खानपाणाची व्यवस्था असलेल्या रेस्टाॅरंटबाबतीच मात्र अजूनही निर्णय प्रलंबितच असल्याचं कळत आहे. 

‘अशा’ आहेत अटी

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील हाॅटेल्सना ८ जुलैपासून आपला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एकूण क्षमतेच्या केवळ ३३ टक्के ग्राहकांनाच या काळात राहण्याची परवानगी असेल. हाॅटेल मालकांना कोरोनासंदर्भातील अटी-शर्थींचं तंतोतंत पालन देखील करावं लागणार आहे. त्यानुसार या हाॅटेल्समध्ये केवळ राहण्याची सुविधा असेल. रेस्टाॅरंट चालवण्याची मुभा नसेल. हाॅटेलमधील जिम आणि स्विमिंग पूल देखील बंदच राहतील. रिसेप्शन काऊंटरवर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची थर्मल स्क्रिनिंग झाली पाहिजे. सॅनिटाझर आणि मास्कचा वापर सक्तीचा असेल. राहण्याऱ्या प्रत्येक ग्राहकाची रुम सॅनिटाईझ झाली पाहिजे, अशा काही अटी हाॅटेल मालकांना स्वयंशिस्तीने पाळाव्या लागतील. 

हेही वाचा - राज्यात लवकरच सुरू होणार हाॅटेल व्यवसाय- उद्धव ठाकरे

कार्यपद्धती निश्चित

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. यावेळी हाॅटेल सुरू करण्यासाठी लवकरच परवानगी देण्यात येतील, असं आश्वासन देखील दिलं होतं. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे, हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे. ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

काळजी आवश्यक

पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसंच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवासी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचं पालन करावं लागणार आहे. हॉटेल व्यवस्थापनांनी त्यांच्याकडे काम करत असलेले कामगार, कर्मचारी यांना काढू नये, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते.

हेही वाचा - वाइन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला
पुढील बातमी
इतर बातम्या