महाड दुर्घटना : एकनाथ शिंदेंनी घेतले वाचलेल्या २ मुलांचे पालकत्व

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाड इथल्या पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन लहानग्यांचे पालकत्व नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आहे. मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत.

तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आलं होतं. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला आहे. या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

"८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे," असं शिंदे यांनी सांगितलं.

दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील. तसंच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या वतीनं उचलण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेची २ आपत्कालीन पथकं आणि अग्निशमन दलाची तुकडीही शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे.


हेही वाचा

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट, धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पालिकेनं हलवलं

वसई विरारमधल्या बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना पालिकेचा झटका

पुढील बातमी
इतर बातम्या