आता डाॅक्टरी पेशा सेवाभावी राहिला नाही, न्यायालयाने व्यक्त केली खंत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

डाॅक्टरी पेशा सेवाभावी राहिला नसल्याची खंत मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील ३ डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केली. सोबतच खटला संपेपर्यंत तिन्ही आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची सूचनाही सरकारला केली. 

विशेष न्यायालयाने डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि भक्ती मेहर या तिन्ही आरोपी डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे झाली. 

दोषारोपपत्रात त्रुटी

या सुनावणीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी दोषारोपपत्र वाचून दाखवलं. या दोषारोपपत्रावरून तपासात अनेक त्रुटी असल्याचं पुढं आलं. तपासयंत्रणेने अद्याप या प्रकरणातील ६ डाॅक्टर साक्षीदारांचे जबाब सीआरपीसी (फौजदारी दंडसंहिता) कलम १६४ अंतर्गत दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदविलेले नाहीत, असं म्हणत न्यायालयाने हे जबाब ३ दिवसांत दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदविण्याचे आदेश तपासयंत्रणेला दिले. 

आरोपींच्या यादीत

सोबतच वरिष्ठ डाॅक्टर पायलचा मानसिक छळ करत असल्याची तक्रार तिच्या आईने व पतीने देऊनही स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. चिंग लिंग च्युंग च्यांग यी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या त्यांच्या जबाबदारीपासून दूर पळाल्या. त्यामुळे त्याही आरोपींच्या यादीत हव्यात, असं न्या. जाधव यांनी म्हटलं. 

जामिनावर सुटकेची विनंती

तर, डाॅ. पायल तडवीने आत्महत्या करावी, असा आरोपींचा हेतू नव्हता. घडलेल्या घटनेचं दु:ख आम्हालाही आहे. मात्र आरोपी या हत्या किंवा सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील आरोपी नसल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्याची विनंती आरोपीचे वकील आबाद पौडा यांनी न्यायालयाला केली.   

तर रूग्णांची अवस्था काय?

त्यावर पीडितेचा सतत मानसिक छळ करण्यात येत होता. एकवेळ शारीरिक जखमा ठीक होतात; पण मनावर झालेला आघात पुसता येत नाही. डॉक्टर त्यांच्या सहकाऱ्यांकडेच मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहात नसतील, तर ते रुग्णांकडे कसं पाहात असतील? आता डॉक्टरी पेशा सेवाभावी राहिला नाही, अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली.


हेही वाचा-

Exclusive : अशी आहे डाॅ. पायल तडवीची सुसाइड नोट, वाचा...

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी दोषारोपपत्र सादर


पुढील बातमी
इतर बातम्या