गुड न्यूज! मुंबईतल्या १८ वर्षांवरील प्रौढांचे १०० टक्के लसीकरण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. मुंबईतील दोन्ही मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या आता १०० टक्के झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ९२ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या.

मुंबईमध्ये १८ वर्षांवरील ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट जनगणनेच्या आधारे निर्धारित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने पहिल्या लसमात्रेचे तब्बल १११ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

२६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्टय़ पालिका प्रशासनानं ठेवले होते. मात्र अखेर एप्रिल महिन्यात हे उद्दिष्टय़ गाठता आले आहे. मात्र आतापर्यंत १ कोटी २ लाख ९६ हजारांहून अधिक नागरिकांनी म्हणजेच १११ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ९२ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट गाठले त्याला ८४ दिवस उलटून गेले असले तरी दुसऱ्या मात्रेचे लक्ष्य पूर्ण होत नव्हते. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या लसीकरणानं हे उद्दिष्टय़ गाठले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत होणाऱ्या लसीकरणात मुंबईबाहेरील नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळे पहिल्या मात्रेचे ९२ लाखाचे लक्ष्य पूर्ण केल्यानंतरही अद्यापही पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.


हेही वाचा

चीनमध्ये कोरोनाचा वेग वाढतोय, पालिका पुन्हा अलर्टवर

नवी मुंबईत १२-१४ वयोगटातील ६९ मुलांचे लसीकरण पूर्ण

पुढील बातमी
इतर बातम्या