महापालिकेच्या मंडईपासून प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाईला सुरुवात

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

२६ जुलै २००५ च्या महापुरानंतर २९ ऑगस्ट २०१७च्या पूरपरिस्थितीला जबाबदार ठरलेल्या पातळ प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाईसाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत आता प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात धडक कारवाई हाती घेण्यात येणार असून याची सुरुवात महापालिका स्वत:च्या बाजार अर्थात मंडईंपासून हाती घेणार आहे. त्यानंतर मुंबईतील दुकानदार आणि फेरीवाल्यांवर प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी पण...

मुंबई प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असतानाही पातळ पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता भाज्यांसह फुलांची आणि हारांची विक्रीही आता पातळ पिशव्यांमधून सर्रास केली जात आहे. मात्र, या पातळ पिशव्यांचा वापर होत असतानाही महापालिका प्रशासनाने डोळे बंद करून याकडे दुर्लक्ष केले होते. यासंदर्भात ‘मुंबई लाइव्ह’ने ‘प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी, पण आम्ही मात्र सुधारणार नाही!’ या मथळ्याखाली आठ दिवसांपूर्वी वृत्त दिले होते.

पर्यावरण मंत्र्यांकडून बंदीची घोषणा

२९ ऑगस्टच्या पूरपरिस्थितीनंतर या पातळ पिशव्यांच मुंबईत पाणी तुंबण्यास जबाबदार असल्याचे रान उठल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बैठक घेऊन प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे जाहीर केले. मात्र, मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असून या अनुषंगानेच महापालिकेने या पातळ प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई त्वरीत हाती घेण्याचा निर्धार केला आहे.

मंडई प्लॅस्टिक पिशवीमुक्त

मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या ९२ मंडईंमध्ये ही कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर फेरीवाले आणि दुकानदार यांच्यावर प्लॅस्टिकविरोधात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

जर आपण आता सरसकट प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई केली तर मोठा विरोध होईल. त्यामुळे याची सुरुवात आपल्यापासूनच करत आहोत. त्यामुळे यापुढे मंडईत प्लॅस्टिक पिशवी वापराला पूर्णपणे बंदी राहणार आहे. गाळेधारकांना प्लॅस्टिक पिशवी देता येणार नाही की ग्राहकांना मंडईत प्लॅस्टिक पिशवी आणता येणार नाही. कोणता माल घ्यायचा झाल्यास ग्राहकांनी कापडी पिशवीचा वापर करावा. दुकानदारांनी, ग्राहकांना अशा पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी परवाना विभागाच्या निरिक्षकांना अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्याचे निधी चौधरी यांनी सांगितले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या