डोंगरी इमारत दुर्घटना: विकासकाची चौकशी करणार- मुख्यमंत्री

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तांडेल स्ट्रीट, अब्दुल हमीद दर्गाजवळील ही इमारत तब्बल १०० वर्षे जुनी असून इमारत पुनर्विकासासाठी विकासकाच्या ताब्यात दिली होती. विकासकाने या इमारतीच्या पुनर्विकासाचं काम वेळेत का सुरू केलं नाही याची लवकरच चौकशी करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Live Updates साठी इथं क्लिक करा

केसरबाई इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. इमारतीच्या बाजूला चिंचोळ्या गल्ल्या असल्यानं मदतकार्यात बचावपथकाला असंख्य अडचणी येत आहेत. 

दरम्यान, ही इमारत पुर्नर्विकासासाठी विकासकाला दिली होती. परंतु विकासकाने पुनर्विकासाचं काम वेळेत सुरू केलं की नाही, याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.  

इमारतीचा पुनर्विकास करण्यास रहिवाशांची मंजुरी होती. परंतु तत्काळ खाली करण्यात येणाऱ्या धोकादायक इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. शिवाय या इमारतीच्या दुरुस्तीचं काम विकासकाने तातडीने सुरू केलं होतं की नाही याची देखील चौकशी करण्यात येईल. परंतु सध्यातरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम प्राथमिकतेने करण्यात येईल.''

या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलिस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. तसंच गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील घटनास्थळी गेल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  


हेही वाचा-

डोंगरीत ४ मजली इमारतीचा भाग कोसळून १२ जणांचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या