यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरेल - महापौर विश्वनाथ महाडेश्वर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत जास्तीचा पाऊस पडल्यावर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी तुंबतं. पाणी तुंबल्यामुळं वाहतूक कोंडी निर्माण होतो आणि चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मात्र, पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी, पालिकेकडून नालेसफाई करण्यात येते. ही नालेसफाई योग्य प्रकरे न झाल्यामुळं मुंबईत पाणी साचतं. परंतु, 'यंदा महापालिकेनं सर्व कामं चोख केली आहेत त्यामुळं यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा दायक ठरणार आहे', अशी ग्वाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे़. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अधिकाऱ्यांची बैठक

पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळावा, यासाठी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी राणीबाग येथील महापौर निवासस्थानी झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्‍य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्‍त प्रवीण परदेशी व इतर अधिकारी उपस्थि‍त होते.

मुंबई पूराच्या पाण्याखाली

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यात अडचणी आल्यास, मुंबई पूराच्या पाण्याखाली गेल्यास सातत्यानं मुंबई महापालिकेवर अपयशाचं खापर फोडलं जातं. प्रत्यक्षात मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, सार्वजनिक बांधकाम विभागासह रेल्वेचीही ठिकठिकाणी कामे सुरू असतात. मात्र, सर्वच प्राधिकरणं आपआपली जबाबदारी झटकून महापालिकेकडं बोट दाखवितात. त्यामुळं महापालिका टीकेची धनी होते. परंतु, या कारणात्सव महापालिकेवर दोषारोष ठेवण्याऐवजी मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावं, या प्रमुख मुद्द्यावर या मान्सूनपूर्व बैठकीत जोर देण्यात आल्याचं समजतं. 

आपत्कालीन परिस्थिती

पालिकेच्या अखत्यारीत असणारी सर्व रुग्णालये, शाळा, विभाग कार्यालयं यांचं दिशादर्शक फलक नागरिकांना आपत्कालीनप्रसंगी उपयोगी पडावेत, म्हणून प्रदर्शनी भागात ते लावण्यात यावे. त्यामुळं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरतील, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच, मुंबईत सार्वजनिक सेवा देणाऱ्या विविध संस्था असल्‍यानं अडचणींच्‍या वेळी फक्‍त मुंबई महापालिकेवरच दोषारोप ठेवण्‍यात येतात. त्यामुळं मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

पालिकेवर टीका

दरवर्षी पावसाळ्याआधी महापालिकेमार्फत नाल्यांची सफाई करण्यात येते. मात्र, तरीही मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यामुळं पालिकेवर टीका केली जाते. त्यामुळं यंदा महापालिकेनं साफ केलेल्या नाल्यांची छायाचित्रं प्रसारमाध्यमांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वृत्तपत्रात तुंबलेल्या नाल्याची छायाचित्रं प्रसिद्ध होतील, तिथं तातडीनं सफाई करून नाल्याचे आधीचे व सफाईनंतरची छायाचित्रं मुंबईकरांना पुरावा म्हणून दाखवण्यासाठी वृत्तपत्रांना पाठवण्यात येणार आहेत.

पर्यायी उपाययोजना

पावसाळ्यात पाणी साचण्‍याची २२५ ठिकाणं व त्‍यापैकी ३५ संवेदनशील ठिकाणी वाहतूक पोलिसांच्‍या मदतीनं योग्‍य त्‍या पर्यायी उपाययोजना कराव्‍यात, अशी सूचना आदित्‍य ठाकरे यांनी केली. तसंच, सोशल मीडियाद्वारे येणाऱ्या तक्रारींबाबत त्‍वरित प्रतिक्रि‍या देण्‍यासाठी पालिकेनं कार्यशाळाही कार्यान्वित करावी, असंही त्यांनी म्‍हटलं.


हेही वाचा -

घाटकोपरच्या पूलबंदीमुळं बेस्टचं लाखोंचं नुकसान

रमजान ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम अधिकाऱ्यांना लवकर पगार


पुढील बातमी
इतर बातम्या