मुसळधार पावसामुळं मुंबईकरांच्या जीवाचे हाल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह ठाणे, कोकण आणि इतर भागांत मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेला तुफान पाऊसामुळं मुंबईकरांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक बंद असल्यानं काहींनी कार्यालय तर काहींनी स्थानकात रात्र काढली. बुधवारी दुपारी दीड ते २ वाजताच्या सुमारास बंद झालेली वाहतूक रात्री १० वाजल्यानंतर देखील सुरु न झाल्यानं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.

स्थानकांमध्ये प्रवासी अडकले

चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घाटकोपर, दादर, ठाणे, अंधेरी अशा अनेक स्थानकांमध्ये प्रवासी अडकले होते. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू सुरू असल्यानं विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही माहिती स्थानकांमध्ये दिली जात नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यातच स्थानकांवर गर्दी असून अर्धा-एक तासानंतर स्थानकात लोकल येत असल्यामुळं इतर प्रवाशांना लोकलमध्ये चढणं शक्य होत नव्हतं.

निवाऱ्याची सोय 

या अडकलेल्या मुंबईकरांसाठी महापालिकेकडून निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. रेल्वे बंद असल्याने आणि पावसात अडकलेल्यांसाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जेवण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. तसंच ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईवर अशी परिस्थिती ओढवल्यामुळं अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चहा, पाणी आणि अल्पोहाराची व्यवस्था केली होती. तसंच, त्यांच्या राहण्याची सुविधाही केली होती. परंतु, मुंबईत दरवर्षी मुसळधार पाऊस पडल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सखल भागांत पाणीच पाणी

मुंबईतील दादर टीटी, चेंबूर, हिंदमाता, साकीनाका जंक्शन, घाटकोपरमधील गांधीनगर, मुलुंडमधील सोनापूर जं., अँटॉप हिल, अंधेरीतील नेताजी पालकर चौक, धारावील ९० फुटी मार्ग, मालाड पश्चिमेतील चिंचोळी मार्ग, मिलन सबवे, वडाळा, किंग्ज सर्कल, पोयसर सबवे, माझगाव, डॉकयार्ड रोड आदी अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. तसंच, परळ, एल्फिन्स्टन, बोरिवलीतील रतननगर आदी भाग, कांदिवलीतील डहाणूकरवाडी, मालाडमधील मामलेदार वाडी, वांद्रे एमआयजी कॉलनी आदी बऱ्याचशा भागातील रस्ते तासंतास पाण्याखाली होते. प्रतीक्षानगर, कुर्ला, सांताक्रूझ स्टेशन पूर्वेकडील वाकोलामधील रस्ता या ठिकाणी कंबरेपेक्षाही जास्त पाणी साचलं होतं.

टॅक्सी, ओला-उबरकडून लूट

लोकल वाहतूक बंद झाल्याने स्टेशनबाहेर पडून बस, रिक्षा, टॅक्सी, ओला, उबरचा पर्याय शोधू लागले. पण कित्येक रिक्षा, टॅक्सीचालकांनी पावसाचा जोर पाहून गाड्या बंद ठेवल्या, तर ओला, उबरसह टॅक्सीचालकांनी वाढती मागणी पाहून जादा दर आकारले. ठाणे ते घाटकोपरसाठी साध्या टॅक्सीसाठी ५०० रुपयेही आकारल्याच्या तक्रारी आहेत. तसंच, दादर ते परळ प्रवासासाठी टॅक्सी चालक १०० रुपये आकारत होते.


हेही वाचा -

तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक पुर्वपदावर

मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या