मोडक सागर पाठोपाठ 'ही' तलावं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

यंदा पावसानं जून व जुलै महिन्यात पुरेशी हजेरी न लावल्यानं मुंबईकरांना पाणी टंचाईचं संकट ओढावलं आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळं पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक सागर हे तलाव मंगळवारी ओसंडून वाहू लागलं. त्यानंतर आता तानसा आणि मध्य वैतरणा हे तलाव भरून वाहण्याच्या दिशेनं असून, या तलावांमध्ये ९२ ते ९३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये बुधवारी तब्बल ८५.१४ टक्के पाणीसाठा जमा झाल्याची खुशखबर आहे. मुंबईला विनाकपात पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ २ लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या ७ ही तलावांतील पाणीसाठा ८५ टक्के म्हणजे १२ लाख दशलक्ष लिटरहून अधिक झाला आहे.

मोडकसागर तलाव मंगळवारी रात्री ओसंडून वाहू लागला. गतवर्षी हा तलाव २६ जुलै २०१९ रोजी भरून वाहू लागला होता. तर, त्या आधीच्या वर्षी १५ जुलै २०१८ रोजी ओसंडून वाहू लागला होता. यंदाच्या पावसात तुळशी, विहारनंतर भरलेला हा तिसरा तलाव आहे. या तलावातील पाणीसाठा एक लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर इतका झाला आहे.

या तलावातून मुंबईला दररोज ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. यंदा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळं मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २३ दिवस उशिरानं हा तलाव भरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा व भातसा या चार महत्त्वाच्या तलावांतील पाण्याची पातळी वाढत आहे. या चार तलावांतून मुंबई शहराला दररोज सरासरी ३२०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.

पिण्यायोग्य पाणीसाठा

  • अप्पर वैतरणा : १,५८,५४९
  • मोडकसागर : १,२८,९२५
  • तानसा : १,४५,०८०
  • मध्य वैतरणा : १,७७,४८८
  • भातसा : ५,९८,६९५
  • तुळशी : ८,०४६
  • विहार : २७,६९८

हेही वाचा -

मुंबईत २१ ऑगस्टपासून २० टक्क्यांऐवजी १० टक्के पाणीकपात

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या