मुंबईकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांना महागाईची झळ लागणार आहे. कारण मुंबईकरांचे पाणी महागले (Water Expensive) असून पाण्यासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

मुंबई पालिकेने (BMC) पाणीपट्टीत सरसकट 7.12 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून म्हणजे आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) या निर्णयामुळे मुंबईकरांना झटका मिळाला आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, भाज्या महागल्यामुळे आधीच सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यात आता आणखी भर पडली आहे. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचे दर वाढले आहेत. मंबईमध्ये वेगवेगळ्या निवासी भागांसाठी पाणीपट्टीचे वेगवेगळे दर आकारले जातात. मुंबई महानगर पालिकेने पाणीपट्टीमध्ये 7.12 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील निवासी भागांतील नवीन दर हे वेगवेगळे राहतील.

प्रत्येक विभागासाठी असे असणार पाणीपट्टीचे दर 

  • झोपडपट्टी परिसरात पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे 5.28 रुपये दर आकारले जाणार आहेत. यापूर्वी 4.93 रुपये आकारले जात होते.
  • इमारतींच्या पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे 6.36 रुपये दर आकारले जाणार आहेत. याआधी 5.94 रुपये आकारले जात होते.
  • व्यवसायिक विभागात पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे आता 47.65 रुपये दर आकारले जातील. याआधी या विभागासाठी 44.58 रुपये आकारण्यात येत होते.
  • गैरवाणिज्य विभागाची पाणीपट्टी 1 हजार लिटरमागे 25.26 रुपये दर आकारले जातील. याआधी याठिकाणी 23.77 रुपये आकारले जात होते.
  • उद्योग तसेच कारखान्यांसाठी पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे आता 63.65 रुपये दर आकारले जातील. यापूर्वी याठिकाणी 59.42 रुपये दर आकारले जात होते.
  • रेसकोर्स आणि फाईव्ह स्टार हॉटेलसाठी पाणीपट्टीत 1 हजार लिटरमागे 95.49 रुपये दर आकारले जाणार आहेत. याआधी याठिकाणी 89.14 रुपये दर आकारले जात होते.


हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! संपूर्ण शहरात 10 दिवसांसाठी पाणीकपात

सीटबेल्ट न लावल्यास काय कारवाई होणार? आजपासून कठोर नियम

पुढील बातमी
इतर बातम्या