मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून सतत कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. दररोज १०००च्या पुढे रुग्ण आढळत आहे. त्यानुसार, गेल्या आठवडाभरापासून सतत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळं मुंबईतील कोरोना वाढीचा दर सोमवारी सरासरी १.२७ टक्क्यांवर पोहोचला. तसंच, रुग्ण दुपटीचा काळ ५३ दिवसांवर घसरला. मुंबईतील ५ हजार ८८८ जणांना सोमवारी कोरोनाची बाधा झाली असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर मुंबईतील बाधितांची एकूण संख्या सोमवारी ४ लाखापार गेली.

वाढत्या रुग्णसंख्येमुळं महापालिकेनं (BMC) रुग्णांच्या सुविधेसाठी संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, दिलासादायक बाब म्हणजे रविवारच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्येत घट झाली. सोमवारी ५ हजार ८८८ मुंबईकरांना बाधा झाल्यानंतर एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ लाख ४ हजार ५६२ वर पोहोचली.

विविध रुग्णालयात उपचार घेणारे ७ पुरुष आणि ५ महिलांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. यापैकी ८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत ११ हजार ६६१ मुंबईकरांना (Mumbai) प्राण गमवावे लागले आहेत. विविध रुग्णालयांतून सुमारे ३ हजार ५६१ रुग्ण सोमवारी कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत मुंबईतील ३ लाख ४४ हजार ४९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या ४७ हजार ४५३ वर पोहोचली आहे. दरम्यान, रुग्ण कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ८५ टक्क्यांवर आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील तब्बल २४ हजार ८०८ संशयित रुग्णांचा महापालिकेनं शोध घेतला आहे. यापैकी ९०५ संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं आहे. तर उर्वरित संशयित रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

मुंबईत बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३३ हजार ९६६ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४० लाख १७ हजार ३१६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी चाचण्या करण्यात आल्या. रविवारी ४६ हजार ४५० चाचण्या करण्यात आल्या होत्या.


हेही वाचा -

नियम न पाळल्यास राज्यात लॉकडाऊन, लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शरद पवारांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, बुधवारी शस्त्रक्रिया


पुढील बातमी
इतर बातम्या