राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवारांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ब्रीच कँडीमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
पवारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिक यांनी ट्विट करत म्हटलं की, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. रविवारी संध्याकाळी पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे.
शरद पवारांना हा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना देण्यात येणारी रक्त पातळ करण्याची औषधे थांबवण्यात आली आहेत. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असंही मलिक यांनी सांगितलं.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाबांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याने त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्यांना बुधवार ३१ मार्चला १० दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील २ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत.