बिडी, सिगारेटच्या दुकानांवर बिस्किट-चॉकलेट विक्रीला बंदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बीडी, सिगारेटचे दुकान चालवणाऱ्यांना यापुढे त्यांच्या दुकानात चॉकलेट, बिस्किट आणि चिप्स यांची विक्री करता येणार नाही. अशाने लहान मुलांना तंबाखू, सिगारेटचे व्यसन जडू शकते. त्यामुळे त्यांना यापासून लांब ठेवण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात एक नोटीस जारी करत सर्व राज्यांना त्यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.

या नोटीसनुसार तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणाऱ्या दुकान किंवा स्टॉलवर चॉकलेट्स, चिप्स, बिस्कीट, शीतपेय आणि लहान मुलांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी असेल. लहान मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सामाजिक संस्था आणि चिकित्सकांनी स्वागत केले आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या प्रत्येक राज्यातील दुकानदारांना यापुढे तेथील पालिकेकडून परवाना मिळवावा लागेल. हा परवाना मिळवल्यानंतर दुकानदारांना त्यांच्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थांव्यतिरिक्त इतर कोणत्याही खाद्यपदार्थांची विक्री करता येणार नाही. सरकारने सर्वप्रथम राजस्थानमध्ये हा नियम लागू केला आहे. आता सर्वांचे लक्ष महाराष्ट्र सरकारकडे लागले आहे.

'तंबाखूजन्य पदार्थांकडे लहान मुले होतात आकर्षित'

टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे दुकानदार चॉकलेट, चिप्स आणि शीतपेय यांच्या नावाखाली मुलांना बीडी, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित करतात. एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुकानदार लहान मुलांच्या नजरेस पडतील, अशा ठिकाणीच तंबाखूजन्य पदार्थ ठेवतात. त्यामुळे मुले त्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना याची सवय जडते. सरकारने उचलेले हे पाऊन योग्य असल्याचेही या संस्थेचे म्हणणे आहे.


हेही वाचा - 

मंत्रालयाच्या दारातच गुटखाबंदीचा पर्दाफाश

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांवर संक्रांत

पुढील बातमी
इतर बातम्या