'या' १० कंत्राटदारांविरोधात एफआयआर नाहीच!

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेने कचऱ्यात डेब्रीजची भेसळ करणाऱ्या कंत्राटदारांच्या नाड्या आवळल्या आहेत. यापूर्वी पालिकेने सात प्रकरणांमध्ये पाच कंत्राटदारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आता आणखी पाच कंत्राटदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कारवाईचा बार फुसका तर नाही?

एस. के. आय. पी. एल- एमके-डिआय, बी. सी. डी (जेव्ही), मेसर्स टेक्नोट्रेड गुरुकृपा (जेव्ही), वाय. खान ट्रान्सपोर्ट कंपनी (जेव्ही) आणि मेसर्स एम. ई-जी. डब्ल्यू. एम या कंत्राटदारांविरोधातही पाच पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची विनंती केली असून पोलिस ठाण्यातून अद्यापही एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कारवाईचा हा बार फुसका तर ठरणार नाही ना? असा प्रश्न आता पडू लागला आहे.

कचऱ्याची तीन सत्रांमध्ये पाहणी

मुंबईत निर्माण होणारा सर्व कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट देवनार, मुलुंड आणि कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते. मात्र, यासाठी नेमलेले कंत्राटदार कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी कचऱ्यासोबत डेब्रीज मिसळत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी याबाबतची तक्रार केल्यांनतर ऑगस्टमध्ये या सर्व कचरा गाड्यांमधील कचऱ्याची तीन सत्रांमध्ये पाहणी केली. यामध्ये काही वाहनांमध्ये डेब्रीज आढळून आले आहे. त्यामुळे या कचरा वाहनाच्या कंत्राटदाराविरोधात पोलीस ठाण्यात पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती.

'एफआयआरच दाखल करण्यात टाळाटाळ'

तब्बल ३९ कचरा गाड्यांमध्ये डेब्रीज मिसळलेले आढळून आले. त्यामुळे दहा कंत्राटदार कंपन्यांविरोधात विक्रोळी, कुर्ला, बोरिवली, ओशिवरा आणि आग्रीपाडा आदी पाच पोलिस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्याची विनंती पोलिस ठाण्यांना करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. मात्र, दोन महिन्यांपासून तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेचे अधिकारी त्या सर्वांवर एफआयआर दाखल केल्याचे सांगत आहेत. परंतु, प्रत्यक्षात हा एफआयआरच दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत या सर्व कंत्राटदारांविरोधातील पुढे कोणती कारवाई केली जात आहे, याची माहिती समितीला देण्याची मागणी केली.

या कंत्राटदारांविरोधात दाखल केली तक्रार

  • आर.एस. जे (जेव्ही)
  • डी. कॉन डू ईट(जेव्ही)
  • मेसर्स कविराज- के.के
  • पीडब्ल्युजी(जेव्ही)
  • एम. के एंटरप्रायझेस (जेव्ही)
  • एस. के. आय. पी. एल-एमके-डीआय
  • बी. सी. डी (जेव्ही)
  • मेसर्स टेक्नोट्रेड गुरुकृपा (जेव्ही)
  • वाय. खान ट्रान्सपोर्ट कंपनी (जेव्ही)
  • मेसर्स एम.ई-जी.डब्ल्यू.एम


हेही वाचा

कचऱ्याच्या गाडीत रॅबिट; कचरा कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या