Advertisement

कचऱ्याच्या गाडीत रॅबिट; कचरा कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल


कचऱ्याच्या गाडीत रॅबिट; कचरा कंत्राटदारांविरोधात एफआयआर दाखल
SHARES

नालेसफाई घोटाळ्यानंतर आता कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात महापालिकेने एफआयआर दाखल केला आहे. कचरा वाहून नेणाऱ्या कॉम्पॅक्टरमध्ये दगड विटांचे रॅबिट आढळून आल्यामुळे कंत्राट कंपनीविरोधात तक्रार नोंदवली आहे. आश्चर्य म्हणजे ६ टनाच्या कॉम्पॅक्टरमध्ये केवळ ६० ते ८० किलो एवढे रॅबिट आढळून आल्यामुळे हा एफआयआर नोंदवला आहे. कचरा उचलणाऱ्या महापालिकेच्या कामगारांनी कचरापेटीभोवतालचे रॅबिट गाड्यांमध्ये टाकले असताना खुद्द कंत्राटदारांनाच याप्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.



मुंबईत दरदिवशी सुमारे ९ हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून हा सर्व कचरा मुलुंड, देवनार तसेच कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. यासाठी सात परिमंडळांमध्ये सात कंत्राटदारांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली होती. या सर्वांचे कंत्राट संपत आले असून नवीन कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत.

मात्र, नवीन कंत्राटदारांची निवड होण्यापूर्वीच जुन्या कंत्राटदारांविरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. घनकचरा विभागाच्या वतीने १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान कचरा वाहून नेणाऱ्या कॉम्पॅक्टर्सची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये काही कॉम्पॅक्टर्समध्ये एक ते दोन बॅग तसेच काहींमध्ये ३५ ते ४० किलो एवढे डेब्रिज आढळून आले. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुळात एका कॉम्पॅक्टरमध्ये कचरा वाहून नेण्याची क्षमता ६ हजार किलो अर्थात ६ टन एवढी असते. त्या तुलनेत कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांची पाहणी केल्यानंतर केवळ एक ते दोन बॅग आढळून आल्यानंतरही सोमवारी एफआयआर दाखल केल्यामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते एक ते दोन पिशवी डेब्रिज मिळणे म्हणजे भ्रष्टाचार किंवा घोटाळा म्हणता येणार नाही. अनेकदा कचरा पिशव्यांमध्ये भरून डेब्रिज कचरापेट्यांशेजारी टाकला जातो. हेच डेब्रिज महापालिकेचे सफाई कामगार गाड्यांत फेकून देतात. डेब्रिज ऑन कॉलची सेवा असली तरी मोठ्या प्रमाणात डेब्रिज असेल तर त्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

पण यात कंत्राटदाराचा दोष नसतो की, त्या कामगारांचाही नसतो. बऱ्याचदा नगरसेवकांची तसेच राजकीय पक्षांची मागणी असते की कचरा पेटीभोवतीचा कचरा उचलला जावा. ५०० किलोपेक्षा अधिक डेब्रिज आढळून आले असते तर कंत्राटदार आणि महापालिकेच्या कामगारांवरही शंका उपस्थित होऊ शकते. मात्र, अशा प्रकारे नाहकपणे एफआयआर दाखल केल्यास भविष्यात कचरा उचलण्यासाठी एकही कंत्राट कंपनी पुढे येणार नाही, अशी भीतीही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


महापालिका उपायुक्त विजय बालमवार यांनी याला दुजोरा दिला असून एका वाहनात हे डेब्रिज आढळून आले आहे. त्यामुळे सर्व गाड्यांच्या फेऱ्यात हे प्रमाण अधिक होऊ शकते. त्यामुळे याविरोधात एफआयआर केल्याचे बालमवार यांनी सांगितले.


विभाग कंत्राटदार कंपनी डेब्रिज
पी-उत्तर विभाग
आर. एस. जे (जेव्ही)
35-40 किलो डेब्रिज
एल विभाग
डी. कॉन डू ईट (जेव्ही)
बॅग डेब्रिज
कुर्ला हस्तांतरण केंद्र
मेसर्स कविराज
के. के. - २ बॅग डेब्रिज
आर-मध्य विभाग
पीव्हीजी (जेव्ही)
1 बॅग डेब्रिज
आर-उत्तर विभाग
पीव्हीजी (जेव्ही)
2 बॅग डेब्रिज
के-पूर्व विभाग
एम.के इंजिनियर्स (जेव्ही)
1 बॅग डेब्रिज



हेही वाचा - 

कचरा विल्हेवाटीसाठी भाजपा नगरसेवकांचा पुढाकार

पाणी उपसणारे पंप दिखाव्यापुरतेच सुरू, कंत्राटदाराची लबाडी उघड


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा