Advertisement

डेब्रिज न उचलणाऱ्या म्हाडाला शिवसेनेचा दणका


डेब्रिज न उचलणाऱ्या म्हाडाला शिवसेनेचा दणका
SHARES

भुलेश्वर येथे कोसळलेल्या उपकरप्राप्त इमारतीचे डेब्रिज वर्ष होत आले, तरी उचलण्यास टाळाटाळ करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दणका दिला. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास हे डेब्रिज दुरूस्ती मंडळाच्या चंदनवाडी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर नेऊन टाकले. या प्रकाराने तेथे उपस्थित अधिकारी गोंधळून गेले. इमारतीचे डेब्रिज लवकरात लवकर न उचलल्यास, संपूर्ण कार्यालयात हे डेब्रिज आणून टाकू, असा इशाराही सकपाळ यांनी यावेळी दिला.

गेल्या पावसाळ्यात भुलेश्वर येथील पुरूषोत्तम नावाची इमारत कोसळली होती. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना दुरूस्ती मंडळाने संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले आहे. इमारत कोसळल्यानंतर दुरूस्ती मंडळाने येथील डेब्रिज त्वरीत हटवणे गरजेचे होते. पण वर्ष होत आले तरी हे डेब्रिज जागच्या जागीच पडून आहे. या डेब्रिजमुळे पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तर मलेरिया, डेंग्यूसारखे आजारही पसरण्याची भिती आहे. त्यामुळे हे डेब्रिज हटवण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. परंतु दुरूस्ती मंडळ डेब्रिज उचलण्याच्या कामात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप सकपाळ यांनी केला. त्यामुळेच सोमवारी चंदनवाडी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर डेब्रिज टाकून त्यांना रहिवाशांच्या त्रासाची जाणीव करून दिल्याचे सकपाळ यांनी स्पष्ट केले.

हे डेब्रिज दुरूस्ती मंडळाच्या सी-2 विभागाचे कार्यकारी अभियंते बी. जी. त्रिपाठी यांच्या टेबलवर टाकण्यात आले होते.
यासंदर्भात त्रिपाठी म्हणाले की, आपण सध्या वांद्रे मुख्यालयात असून टेबलवर डेब्रिज टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. भुलेश्वर येथील डेब्रिज हटवण्यात आजूबाजूच्या चार दुकांनाचा अडथळा येत आहे. या दुकांनामुळे मशीन आणि गाड्या आत नेण्यास अडथळा होत आहे. शिवाय हे दुकानदार सहकार्य करत नसल्याचेही त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. हे डेब्रिज लवकरच हटवू, असे आश्वासनही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा