
गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या फेज 3-बी अंतर्गत जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी टनल बोरिंग मशीन (TBM) चे घटक शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया 11 मार्च 2026 रोजी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात औपचारिकपणे सुरू झाली.
बोगदा किंवा भूमिगत प्रकल्पांमध्ये शाफ्ट म्हणजे जमिनीपासून सरळ खाली खोदलेला उभा मोठा खड्डा किंवा प्रवेशद्वार. या मार्गातून कामगार, यंत्रसामग्री आणि साहित्य खाली बोगद्याच्या ठिकाणी नेले जाते.
ही प्रक्रिया नियोजित वेळेपेक्षा तीन महिने आधी सुरू झाल्यामुळे प्रकल्पाच्या एकूण कामाच्या गतीला चालना मिळणार आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थळाला भेट देऊन कामाची तपासणी केली. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बोगदा खोदकामाला वेग मिळणार आहे.
मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील रस्ते जोडणी सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका 12.20 किमी लांबीचा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव (पश्चिम) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून मुलुंड (पूर्व) येथील खिंडीपाडापर्यंत जुळ्या भुयारी बोगद्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या समांतर बोगद्यांची लांबी प्रत्येकी 4.70 किमी असेल.
प्रत्येक बोगद्याचा व्यास 14.20 मीटर असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भागातून जाताना तो 13 मीटर होईल. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या बोगद्यांचे बांधकाम राष्ट्रीय उद्यानातील टेकड्यांच्या खाली पूर्णपणे भूमिगत पद्धतीने केले जाणार आहे.
प्रत्येक बोगद्यात तीन वाहतूक मार्गिका (लेन्स) असतील. तसेच वायुवीजन प्रणाली, आधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि इतर सेवांसाठी युटिलिटी डक्ट्सची सोयही करण्यात येणार आहे. बोगद्यांचे खोदकाम टनल बोरिंग मशीन (TBM) च्या साहाय्याने केले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी टेराटेक कंपनीने तयार केलेल्या S-118 आणि S-119 या दोन टीबीएमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक मशीनचे वजन 2,175 मेट्रिक टन असून त्याचा व्यास 14.49 मीटर आहे. मुंबईत आतापर्यंत वापरल्या गेलेल्या टीबीएममध्ये हा सर्वात मोठा व्यास आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे जुळ्या बोगद्यांसाठी आवश्यक असलेल्या लाँचिंग शाफ्टचे पहिले टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या शाफ्टची लांबी सुमारे 200 मीटर, रुंदी 50 मीटर आणि खोली 30 मीटर आहे. टीबीएम शाफ्टमध्ये उतरवण्यासाठी आवश्यक असलेले खोदकाम पूर्ण झाले आहे.
याशिवाय शाफ्टच्या तळाशी २० मीटर × २० मीटर × २.५ मीटर आकाराचा मजबूत वक्राकार काँक्रीट क्रेडल तयार करण्यात आला आहे. टीबीएमला सुरक्षितपणे स्थिर ठेवण्यासाठी आणि खोदकाम सुरू करताना योग्य दिशेने प्रक्षेपित करण्यासाठी हा क्रेडल महत्त्वाची भूमिका बजावतो. टीबीएम कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेले क्रेडल बांधकामही यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
11 मार्चपासून टीबीएमचे घटक शाफ्टमध्ये उतरवण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी 800 मेट्रिक टन आणि 350 मेट्रिक टन क्षमतेचे अत्याधुनिक क्रेन्स साइटवर तैनात करण्यात आले असून त्यांची लोड टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या क्रेन्सच्या सहाय्याने टीबीएमचे विविध भाग टप्प्याटप्प्याने शाफ्टमध्ये उतरवले जात आहेत.
आज १135 मेट्रिक टन वजनाचा ‘टाइप-A शिल्ड’, जो टीबीएमचा मुख्य कटिंग घटक आहे, तो यशस्वीरीत्या शाफ्टमध्ये उतरवण्यात आला.
टीबीएमचे मेन शिल्ड, कटर हेड, स्क्रू कन्वेयर, मेन बेअरिंग आणि इरेक्टर यांसारखे महत्त्वाचे तांत्रिक घटक यापूर्वीच एकत्रित करण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात हे घटक शाफ्टमध्ये उतरवून टीबीएमची अंतिम रचना तयार केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष बोगदा खोदकाम सुरू होईल.
दादासाहेब फाळके चित्रनगरी / संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून मुलुंड–अमरनगरपर्यंत भूमिगत बोगदा खोदकाम पूर्ण झाल्यानंतर टीबीएम मुलुंड–अमरनगर येथील ‘रिट्रिव्हल शाफ्ट’मध्ये बाहेर येईल. त्यानंतर मशीन पृष्ठभागावर आणून त्याचे विघटन केले जाईल.
