Advertisement

नवी मुंबई मेट्रोचा विस्तार होणार

या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल तसेच राष्ट्रीय महामार्ग-48 च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई मेट्रोचा विस्तार होणार
SHARES

मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी  घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल हा भुयारी मार्ग, फाऊंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17 हजार 36 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

तसेच नवी मुंबई मेट्रो (navi mumbai metro) मार्ग 1 ए आणि मार्ग 2 च्या 5 हजार 575 कोटी रुपयांच्या अशा एकूण 22 हजार 611 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होऊन  वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.

या बैठकीत गायमुख ते फाऊंटन हॉटेल दरम्यान 5.86 किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग आणि फाऊंटन हॉटेल ते भाईंदरदरम्यान 9.58 किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्याच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल तसेच राष्ट्रीय महामार्ग-48 च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार आहे.

तसेच त्याचा व्यास 14 मीटर असेल. सुमारे पाच वर्षांत हा बोगदा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलावर ताशी 100  किलोमीटर वेगाने वाहतूक शक्य होणार आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी   उपस्थित होते.

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग 2 (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-4) या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे.

या विस्तारामध्ये मार्ग 1 ए वर दोन आणि मार्ग 2 वर 11 स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे.

घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विशेषतः ठाणे (thane) आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच प्रकल्प परिसरात एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मान्यता दिली.



हेही वाचा

दादर BEST बस अपघात: कुटुंबाचा एकमेव आधार हरपला

मान्सूनसाठी MMRDA सज्ज; आपत्कालीन यंत्रणा तैनात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा