Advertisement

यांत्रिक झाडू सफाईत कंत्राटदाराची हातसफाई, दोन तासातच आठ रस्ते साफ!


यांत्रिक झाडू सफाईत कंत्राटदाराची हातसफाई, दोन तासातच आठ रस्ते साफ!
SHARES

मुंबईतील रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूद्वारे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर महापालिकेच्या ए विभाग कार्यालयातील फोर्ट, नरिमन पॉईंट भागातील आठ रस्त्यांची सफाई या मॅकॅनिकल पॉवर स्विपिंगद्वारे केली जात आहे. परंतु, २४ तास यांत्रिक झाडूद्वारे साफसफाई करण्याचे कंत्राट दिलेले असताना प्रत्यक्षात मोठ्या यांत्रिक झाडूद्वारे केवळ दोन ते तीन तासच सफाई केली जात असल्याची बाब समोर आली आहे. ज्या रस्त्यांच्या कामासाठी आठ तासाचा अवधी लागतो, त्या रस्त्यांची कामे ही दोन ते तीनच तासांतच आटोपून सफाईचे काम बंद करणाऱ्या कंत्राटदाराची हातसफाई उघड झाली आहे. खुद्द महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीस ही बाब आल्यामुळे आता कंत्राटदारावर कारवाईची टांगती तलवार आहे.


सफाई कामगार काम करत नसल्यामुळे...

मुंबईतील रस्त्यांची स्वच्छता आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास नीटनेटकी राहावी यासाठी महापालिकेच्या वतीने यांत्रिक झाडूद्वारे सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या सफाई कामगारांकडून योग्य प्रकारे सफाईचे काम होत नसल्यामुळे मागील महापालिकेतील गटनेत्यांच्या मागणीनुसार यांत्रिक झाडूची सेवा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या प्रत्येक विभागातील एक रस्ता आणि ए विभागातील आठ रस्त्यांची कामे यांत्रिक झाडूद्वारे करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.


यांत्रिक झाडूनेही सफाईचा हेतू साध्य होईना!

‘ए’ विभागासाठी राम लक्ष्य रक्षित (जेव्ही) या कंपनीला पाच वर्षांसाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. परंतु ज्या आठ रस्त्यांसाठी यांत्रिक झाडूने सफाई करायची आहे, त्या रस्त्यांच्या सफाईत कंत्राटदाराकडून हातसफाई केली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या आठ रस्त्यांच्या सुमारे ६८०० मीटर एवढ्या क्षेत्रफळाची सफाई पूर्णपणे न करताच सफाई केल्याचे वारंवार दाखवले जात असे. तसेच सफाई केल्यानंतरही कचरा कायम राहत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे यांत्रिक सफाईनंतरही स्वच्छतेचा हेतू साध्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे.


महापालिकेची फसवणूक

यांत्रिक झाडूसाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून आठही रस्त्यांवर वाहन फिरवून स्वच्छता राखली जात नसल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या कनिष्ठ आवेक्षकांनी स्वत: जातीनिशी उभं राहून याचा आढावा घेतला. त्यावेळी या सर्व रस्त्यांची सफाई पूर्ण करण्यासाठी आठ तासांचा अवधी लागत असल्याचे आढळून आले. परंतु, कंत्राटदारांची वाहने ही केवळ दोन ते तीनच तास फिरवून सफाई झाल्याचा दावा करत असत. त्यामुळे एक प्रकारे महापालिकेची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन शिफ्टमध्ये ही सफाई केली जात आहे. यामध्ये रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत तिसरी शिफ्ट सुरु होते. परंतु, या तिसऱ्या शिफ्टमध्येच कंत्राटदाराकडून योग्य प्रकारे सफाई केली जात नसल्याची तक्रार आली आहे.


महापालिकेच्या सुपरवायझरकडूनही दुर्लक्ष

सफाई कामगार काम करत नसल्यामुळे यांत्रिक झाडूचा पर्याय निवडण्यात आला होता. परंतु यांत्रिक झाडूने सफाई करुनही ते योग्य प्रकारे स्वच्छता राखत नसल्याचे दिसून आल्यावर विभागातील घनकचरा विभागाचे कर्मचारी याला आक्षेप घेत नव्हते. त्यामुळे कंत्राटदाराचे चांगलेच फावले होते. परिणामी, थोडेसे अंतर वाहन फिरवून सफाई केल्याचे नाटक कंत्राटदाराकडून केले जात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


सहायक आयुक्तांनी घेतली तक्रारीची दखल

महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क  साधला असता त्यांनी याला दुजोरा देत याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्याचे सांगितले. याबाबत खुद्द अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे तक्रार गेली असून लवकरच त्यांच्यासोबत जॉईंट विजिट करुन कामाची पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यांत्रिक झाडूने सफाई करण्यात येणाऱ्या रस्त्यांची नावे

  • मादाम कामा रोड
  • के. बी. पाटील रोड
  • एम. जी. रोड
  • महापालिका मार्ग
  • डी. एन. रोड
  • वीर नरीमन रोड
  • एन. एस. रोड



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा