कामगारपद भरतीत प्रत्येक जागेसाठी २०९ उमेदवारांमध्ये स्पर्धा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेतील कामगापदासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन भरतीसाठी १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत २ लाख ९० हजार अर्ज प्राप्त झाले आहे. एकूण नोंदणी झालेल्या ३ लाख ६७ हजार अर्जांपैकी केवळ २ लाख ९० हजार उमेदवारांनीच अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे १३८८जागांसाठी होणाऱ्या या भरतीमध्ये एका जागेसाठी सरासरी २०९ उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे.

मुंबई महापालिकेचे, जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त असून या सर्व विभागांत कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार आदी वर्गांतील १३८८ रिक्तपदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत.

अनामत रक्कम भरलेल्या अर्जांचाच विचार

राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत ११ डिसेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत एकूण ३ लाख ६६ हजार ९९४ अर्जांची नोंदणी झाली होती. परंतु, १ जानेवारीच्या दुपारपर्यंत २ लाख ९० हजार उमेदवारांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्यांपैकी केवळ २ लाख ९० हजार उमेदवारांच्या अर्जांचा विचार केला जाणार आहे. मात्र, अनामत रक्कम न भरल्यामुळे नोंदणी केलेले सुमारे ७७ हजार अर्ज बाद ठरले आहेत.

एसएमएसवर मिळणार परीक्षेची माहिती

अनामत रक्कम भरलेल्या अर्जांचाच विचार केला जाणार असल्याचे सामान्य विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व अर्जांची पडताळणी केली जाईल. यामध्ये चुकीच्या पद्धतीने, तसेच निकषांमध्ये न बसलेले अर्ज बाद करून पात्र ठरलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. या पात्र ठरलेल्या अर्जांच्या उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) परिक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण कळवले जाईल, असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा

महापालिका कामगार भरती प्रक्रिया : ऑनलाईन अर्जात फक्त माहिती हवी, कागदपत्रे नाही!

पुढील बातमी
इतर बातम्या