आरोग्य विभागाने तीन महिन्यांत राज्यातील 9 लाख 84 हजार मुलींना HPV लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व पालकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आणि आपल्या 14 वर्षांच्या मुलींना लस देण्याचे आवाहन केले आहे.
हा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्र सरकारच्या आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणार आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (सर्व्हायकल कॅन्सर) संरक्षणासाठी राष्ट्रीय मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण मोहीम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. ज्या मुलींचे वय 14 वर्षे पूर्ण झाले आहे पण 15 वर्षे पूर्ण झालेले नाही, त्यांना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ राज्यातील 9 लाख 84 हजार 414 मुलींना मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत आणि पालकांच्या संमतीने स्वेच्छेने केले जाणार आहे.
भारतामध्ये महिलांमध्ये आढळणारा सर्व्हायकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. दरवर्षी सुमारे 80 हजार नवे रुग्ण आढळतात, तर 42 हजारांहून अधिक महिलांचा मृत्यू होतो.
HPV प्रकार 16 आणि 18 पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष मोहिम म्हणून राबवली जाईल आणि त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग बनवली जाईल.
प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरण केंद्र सरकारच्या U-WIN या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
हेही वाचा